• खा. वंदना चव्हाण यांची संकल्पना – ‘युथ कनेक्ट’चा पुढाकार.
पुणे,दि. ७( punetoday9news):- नागरिकांमध्ये कोविडसंदर्भात जागृती करून त्याला नियंत्रणात आणण्यासाठी ‘युथ कनेक्ट’ ( #YouthConnect )
च्यावतीने फेसबुकवर ‘द पुणे कोविड बुलेटीन’ हे व्यासपीठ सुरु करण्यात आले आहे. शहराच्या माजी महापौर आणि राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या व्यासपीठाच्या माध्यमातून कोविड महामारी संदर्भातील वेगवेगळी माहिती, नागरिकांनी आणि रुग्णांनी घ्यावयाची काळजी, या आजारावर खंबीरपणे मात केलेल्या पुणेकरांच्या सकारात्मक कथा यासारखी माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली जाणार आहे. यामुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर होण्यास आणि जागृती होण्यास मदत होणार आहे. यासोबतच कोरोनाच्या बदलत्या स्वरूपानुसार त्या-त्या वेळी आवश्यक ती माहिती देण्याचा या व्यासपीठाचा प्रयत्न राहील. तसेच या व्यासपीठाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून काम करणाऱ्या कोविड योध्यांबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.
Doctor On Call हा उपक्रम ‘द पुणे कोविड बुलेटीन’ या फेसबुक पेज व्यासपीठाचे वैशिष्ट्य आहे. फेसबुक live च्या माध्यमातून डॉ. शिशिर जोशी हे दर शनिवारी दुपारी ३.३० वाजता कोविड संदर्भातील नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंका निरसन करणार आहेत, तसेच समुपदेशन करणार आहेत. त्यासाठी फेसबुकवर ‘पुणे कोविड बुलेटिन’ या पेजला अधिकाधिक नागरिकांनी फॉलो आणि इतरांसोबत शेअर करावे, असे आवाहन खा. वंदना चव्हाण यांनी केले आहे.
या फेसबूक पेजची जबाबदारी चंदा पाटील, विद्या तिवारी, प्रियांक शाह आणि ‘युथ कनेक्ट’चे प्रमुख राहुल पोटे हे सांभाळत आहेत.
“सध्याच्या कोविडच्या वातावरणात पुणेकरांना विविध विषयांसंदर्भात माहिती मिळावी यासाठी ‘द पुणे कोविड बुलेटीन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमास खा. वंदना चव्हाण यांचे मोठे सहकार्य लाभले आहे”.– राहुल पोटे.
Comments are closed