पिंपरी,दि.८( punetoday9news):-  ‘हे गडकोट आपली पंढरी’ या व्हॉट्सॲप ग्रुप तर्फे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन केले होते. या व्याख्यान मालेत जुन्नर येथील इतिहास अभ्यासक आणि शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संघटनेचे विनायक खोत आणि इतिहास अभ्यासक शिल्पाताई परब- प्रधान यांनी व्याख्यान दिले.

खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि जुन्नर या विषयावर व्याख्यान देताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वीचा इतिहास, जुन्नर परिसर येथील गडकोट, लेण्यांविषयी माहिती सांगितली. तसेच दादरच्या इतिहास अभ्यासक शिल्पाताई परब- प्रधान यांनी राजाभिषेेक या विषयावर व्याख्यान देताना राज्याभिषेक न म्हणता राजाभिषेक म्हणायला हवे हे अतिशय समर्पक पणे पटवून दिले, तसेच राजाभिषेक का केला, राजाभिषेकाची पाश्वभूमी, राजाभिषेक रायगडावरच का केला, राजाभिषेक सोहळ्याचे मार्मिक वर्णन, तसेच दोन्ही व्याख्यात्यांनी उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांची ही उत्तरे दिली. त्यात राजाभिषेका संदर्भातील ज्या अख्यायिका आहेत त्या संदर्भात खूप चांगल्याप्रकारे स्पष्टीकरण देण्यात आले तसेच महाराजांच्या जीवन प्रसंगावर बऱ्याच आख्यायिका आहेत त्याबाबतीत ही दोन्ही व्याख्यान कर्त्यांनी मार्मिक उत्तरे दिली. तसेच जुन्नर मधील गडकोटांची तसेच राजगड व रायगड या गडकोटांचीही माहिती यावेळी दिली.

कार्यक्रमाचे नियोजन हे गडकोट आपली पंढरी या ग्रुपमधील केशव अरगडे यांनी केले. तर सूत्रसंचालन वैशाली अरगडे यांनी केले.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!