पुणे,दि.११( punetoday9news):- कोरोना प्रादुर्भावाचा विचार करता ज्या उमेदवारांना आतापर्यंत सेट परीक्षेचे अर्ज भरता आले नाहीत त्यांना अर्ज संधी मिळावी यासाठी सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे . विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यात 26 सप्टेंबर 2021 रोजी होणाऱ्या 37 व्या राज्य पात्रता परीक्षेचा ( सेट ) अर्ज भरण्याची मुदत 10 जून ऐवजी आता 17 जून पर्यंत वाढविण्यात आली आहे .
तसेच 18 जून ते 25 जून या कालावधीतही विद्यार्थ्यांना 500 रुपये विलंब शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहेत . ऑनलाईन अर्जात चुकीची माहिती भरली गेली असल्यास ती माहिती दुरुस्त करण्याचीही संधी सेट विभागाकडून 26 ते 30 जून यादरम्यान दिली आहे . याबाबची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव तथा सेट विभागाचे सदस्य सचिव डॉ . प्रफुल्ल पवार यांनी दिली .
सेट परीक्षा विभाग , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली ( 37 वी ) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा ( सेट ) रविवार , 26 सप्टेंबर , 2021 रोजी आयोजित करण्यात येत आहे . सदर परीक्षा मुंबई , पुणे , कोल्हापूर , सोलापूर , अहमदनगर , नाशिक , धुळे , जळगाव , औरंगाबाद , नांदेड , अमरावती , नागपूर , चंद्रपूर , गडचिरोली व पणजी ( गोवा ) या केंद्रावर घेण्यात येईल . विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (https://setexam.unipune.ac.in) उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच भरावयाचा आहे .
Comments are closed