बीड, दि.१२ (punetoday9news):- करोनामुळे मयत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून मंत्रीमंडळात चर्चा करुन न्याय देण्याची भूमिका घेऊ अशी ग्वाही काँग्रेसचे नेते ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व संतोष मानूरकर यांनी राऊत यांना निवेदन देऊन काँग्रेसने पत्रकारांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली.
बीड येथे काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक रविंद्र दळवी यांच्या निवासस्थानी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी शुक्रवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे व संतोष मानूरकर यांनी नितीन राऊत यांना निवेदन देऊन मध्यप्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रातही करोना काळात मयत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची आणि महामारीच्या काळात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून सुविधा देण्याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय घ्यावा अशी विनंती केली. डॉ.राऊत यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करुन लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी या विषयावर बोलून मंत्रीमंडळात चर्चा करू आणि पत्रकारांना न्याय देण्याची भूमिका घेवू अशी ग्वाही दिली. यावेळी रविंद्र दळवी यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी उपस्थित होते.
Comments are closed