सांगवी, दि.१५( punetoday9news):- पिंपरी-चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवी मधुबन येथे राहणारा ऋतुराज गायकवाड याची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे.आपल्या नैसर्गिक,रेखीव खेळीने क्रिकेट विश्वात ठसा उमटवत येत्या १३ जुलै पासून सुरू होणा-या वनडे व टी टेव्ंटी श्रीलंका दौ-यासाठी या शैलीदार फलंदाजाची निवड करण्यात आली आहे.यामुळे पिंपरी-चिंचवडचा भारतीय संघात देशाचे प्रतिनिधित्व करणारा तो पिंपरी-चिंचवडचा पहीला खेळाडू ठरला आहे.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाने हे ऋतुराजाचे मुळगाव. वडील दशरथ गायकवाड नुकतेच लष्कर सेवेतून वरिष्ठ पदावरून सेवानिवृत्त झालेले तर आई सविता गायकवाड शिक्षिका व गृहिणी आहेत.
२४ वर्षीय ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली.मधुबन जुनी सांगवी च्या मातीत वाढलेल्या या मराठमोळ्या खेळाडूवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्रीलंका दौ-यासाठी त्याला मधुबन व सांगवीकरांनी शुभेच्छा दिल्या.येथील मधुबन मित्र मंडळाच्या मोजक्या रहिवाशांच्या वतीने त्याचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून निवडी बद्दल सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गणेश ढोरे, राजु ढोरे, योगेश मोहारे, रविंद्र गायकवाड, आदीत्य ढमाले, अविनाश मारणे, दिवाणजी ढोकळे, पत्रकार रमेश मोरे आदी उपस्थित होते.
महापौर उषा ढोरे यांनी घरी भेट देत दिल्या शुभेच्छा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक उषा उर्फ माई ढोरे यांनी ऋतुराजला घरी भेट देवून श्रीलंका दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जवाहर ढोरे, अरविंद ढोरे, स्वरा ढोरे, ज्ञानेश ढोरे उपस्थित होते.
आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधले. जुनी सांगवी पिंपरी चिंचवडच्या या सुपुत्राने भारतीय संघात स्थान मिळवले आहे.
स्थानिक क्रिकेटमध्ये ऋतुराज महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. २०१६ साली वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ऋतुराजने रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केले. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत चांगल्या कामगिरीच्या जोरावर ऋतुराजला देवधर करंडक भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. तर २०२० सालात ऋतुराजने धडाकेबाज फलंदाजी करून खेळात सातत्य राखले.
येथे घेतले क्रिकटचे धडे
त्याने पिंपरी चिंचवडच्या दिलीप वेंगसरकर अकादमीतून क्रिकटचे प्रशिक्षक कोच मोहन जाधव, फिटनेस कोच डॉ.विजय पाटील,संदीप चव्हाण,शादाब शेख यांच्या तालमीत ऋतुराजने क्रिकेटचे धडे घेतले.
Comments are closed