२१२ पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये छायाचित्राविना २३,६४५ मतदार.
पुणे दि. 23( punetoday9news):- 212 पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम सुरू असून मतदारांनी मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, 212 पर्वती विधानसभा मतदार संघाचे उत्तम पाटील यांनी केले आहे.
२१२ पर्वती विधानसभा मतदार संघामध्ये मतदार यादी शुध्दीकरण मोहिम भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनांनुसार राबविण्यात येत आहे. त्यानुसार मतदार यादीमध्ये नवीन मतदारांची नोंदणी करणे, मयत, स्थलांतरीत दुबार मतदारांची वगळणी करणे, मतदार यादीमध्ये नाव आहे परंतु फोटो नाही अशा मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे, Logical Error ची दुरुस्ती करणे इत्यादी कामकाज सुरु आहे.
२१२ पर्वती विधानसभा मतदार संघामधील मतदार यादीमध्ये नाव आहे परंतु छायाचित्र नसलेल्या उर्वरीत मतदारांची (Residual Voters) संख्या २३,६४५ इतकी आहे. अशा मतदारांनी ८ दिवसांमध्ये आपली छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे अथवा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, २१२ पर्वती विधानसभा मतदार संघ, दुसरा मजला, बाबुराव सणस क्रीडांगण, सारस बागेजवळ, पुणे-३० यांचे कार्यालयाकडे जमा करावे.
जे मतदार पुढील ८ दिवसांत छायाचित्र जमा करणार नाहीत अशा मतदारांची नावे भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विहित कार्यपध्दतीचा अवलंब करुन त्यांची नावे मतदार यादीतून वगळणेत येतील याबाबत संबंधीत मतदारांनी नोंद घ्यावी. तसेच छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी (Residual Voters) मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयामध्ये पडताळणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचे वेबसाईट pune.nic.in / pune.gov.in या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या यादीचे अवलोकन करुन आपले नाव यादीमध्ये असल्यास येत्या ८ दिवसांमध्ये आपले छायाचित्र उपरोक्त नमूद ठिकाणी जमा करावे. सदर कार्यक्रम कालमर्यादित आहे. त्यासाठी मतदारांनी सदर यादी पडताळणी करुन मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन उत्तम पाटील, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, २१२ पर्वती विधानसभा मतदार संघ, पुणे यांचे वतीने करण्यात येत आहे.
Comments are closed