पिंपरी, दि. २४( punetoday9news):- महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचा-यांनी नोकरी व्यतिरिक्त अन्य व्यवसाय तसेच बेकायदेशीर कामकाजामध्ये सहभाग घेऊ नये याची पुरेपुर दक्षता घ्यावी. अन्यथा वर्तणूक नियमाचा भंग केल्याप्रकरणी संबंधिताविरुध्द नियमाधीन कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी दिला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये गट अ ते ड च्या संवर्गात अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अशा अधिकारी व कर्मचा-यांकडे कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने विविध स्वरुपाचे आर्थिक तसेच प्रशासकीय स्वरुपाचे कामकाज सोपविण्यात आलेले आहेत. दैनंदीन कार्यालयीन कामकाज करीत असताना विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा अनेक नागरिक, ठेकेदार व इतर संस्था यांचेशी कामकाजानिमित्त संपर्क येत असतो. सदरची कामे करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना विविध प्रलोभने व आर्थिक अमिषे दाखविले जातात किंवा विविध स्वरुपाची कार्यालयीन कामे करण्यासाठी वेळप्रसंगी मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून देखील पैशाची मागणी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरची बाब कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी ठरते.
याव्यतिरिक्त महानगरपालिकेच्या काही अधिकारी व कर्मचारी यांचेकडून महानगरपालिकेच्या हद्दीत विविध स्वरुपाचे अनधिकृत बिगरपरवाना बांधकामे केलेली असू शकतात अथवा महानगरपालिकेच्या अथवा शासकीय जमिनीवर अतिक्रमणे करुन व्यवसाय केला जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचेकडून बेकायदेशीर काम होवू शकते अशी शक्यता विचारात घेता, त्यांच्या अशा कृत्यामुळे महानगरपालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन होवून महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा भंग होवू शकेल. त्यामुळे अशा स्वरुपाच्या गोष्टी भविष्यामध्ये घडणार नाही याची दक्षता एक कर्तव्यदक्ष शासकीय अधिकारी व कर्मचारी म्हणून प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणुक)नियम १९७९ मधील नियम १६ मधील तरतुदी नुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी व त्याच्या कुटुंबातील कोणतोही व्यक्ती एखाद्या व्यापारात अथवा धंद्यात गुंतलेली असेल किंवा व्यवस्था पाहत असेल तर तो तसे शासनास कळविल अशी स्पष्ट तरतुद आहे.
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे कुंटुबिय (पती/पत्नी/मुलगा/मुलगी) हे स्वत:चा व्यवसाय करीत असल्यास व असा व्यवसाय महापालिका कामकाजाशी निगडीत असल्यास सदरची बाब महापालिकेस वेळीच कळविणे आवश्यक राहील, जेणेकरुन महापालिका अधिकारी/कर्मचारी यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्याने महापालिका कामकाजात सहभाग दिसुन येणार नाही याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घेणे आवयक आहे जेणेकरून वर्तणूक नियमाचा भंग होणार नाही.
आयुक्त राजेश पाटील यांनी स्वतंत्र निर्गत केलेल्या परिपत्रकान्वये,महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी कर्मचारी व उपरोक्त नमूद केलेप्रमाणे त्यांचे कुटुंबातील कोणताही सदस्य व्यवसाय करीत असेल तर त्याची माहिती महापालिका अधिकारी कर्मचारी यांने महापालिकेस कळविणे बंधनकारक राहील. याशिवाय ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी शासकिय व महानगरपालिकेच्या राखीव जमिनी व मिळकतींवर अतिक्रमण करुन व्यवसाय उभारले असल्यास ते ताबडतोब स्वत:हून स्वखर्चाने काढुन घ्यावेत व तसे महापालिकेस तात्काळ अवगत करावे. तदनंतर असे बांधकाम/ व्यवसाय झाल्याचे अथवा केल्याचे निर्दशनास आल्यास ते तात्काळ निष्कासीत करण्याची कार्यवाही करण्यात येवून संबंधिताविरुध्द शिस्त भंग विषयक कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. नमुद केलेप्रमाणे कोणत्याही बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामे अथवा नियमबाहय कामामध्ये सहभाग नोंदवु नये याची पुरेपुर दक्षता घ्यावी. अन्यथा वर्तणूक नियमाचा व सदर परिपत्रकाचा भंग केल्याप्रकरणी सबंधिताविरुध्द यथोचित नियमाधीन कारवाई प्रस्तावित करणेत येईल याची सर्व सबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी स्पष्टपणे नोंद घ्यावी असे परिपत्रकात स्पष्टपणे नमूद केले आहे.
Comments are closed