सांगवी विकास मंच व मित्रांच्या साहाय्याने केले हे कौतुकास्पद काम.

पिंपरी, दि.२५(punetoday9news):- कोरोनाच्या कठीण काळात अनेकांनी इतरांना मदतीचा हात दिला आहे. गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. असेच एक कौतुकास्पद काम सांगवीतील ओंकार महेश भागवत या तरुणाने केले आहे. ओंकार भागवत यांनी आपल्या सांगवी विकास मंचच्या माध्यमातून दररोज तीनशे याप्रमाणे दोन महिन्यात अठरा हजार जेवणाचे डब्बे पुरविले.
सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असली, तरी एप्रिल व मे महिन्यात कोरोनाने कहर केला होता. अनेकांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांच्या घरी जेवण बनवायला कोणी नाही. तसेच अभ्यासासाठी पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात आलेले विद्यार्थीही कोरोना पॉझिटिव्ह आले. काही ज्येष्ठ नागरिकांचाही जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या सर्वांसाठी जेवण पुरविणे गरजेचे होते. नेमकी ही गरज लक्षात घेऊन ओंकार भागवत या तरुणाने वडील महेश भागवत व काही मित्रांना ही वस्तुस्थिती सांगितली. गरजूंना मोफत जेवणाचे डबे पुरविण्याचे ठरले. सांगवी विकास मंचच्या माध्यमातून जेवणाचे डबे पुरवायला सुरुवातही केली. दररोज तीनशे गरजू व कोरोनाग्रस्त, त्यांचे नातेवाईक जेवणाचा लाभ घेत होते. गेल्या दोन सव्वादोन महिन्यात तब्बल अठरा हजार जेवणाचे डबे मोफत पुरविण्यात आले. ओंकार भागवत यांना यासाठी वडील महेश भागवत, आई नीलिमा भागवत, मित्र परिक्षीत कुलकर्णी, संभाजी मोरे, मनीषा संजय खळदकर, सोनल श्रीरंग रहिंज यांचे मोठे सहकार्य मिळाले.


याबाबत ओंकार भागवत सांगतात, की डबे दिल्यानंतर अनेकजण आभार मानतात, तेव्हा आपण समाजासाठी काहीतरी करतोय याचे समाधान वाटते. या महामारीत अनेक लोकांचे जेवणाचे हाल झाले, त्यामुळे त्यांना मदत करायला हवी असे वाटले. हे काम सुरू करण्यामागे एकच भावना होती ती म्हणजे लोकांचे हाल व्हायला नको. त्यामुळे आपल्याकडून जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत हे मी करत राहील. लहानपणापासूनच मला इतरांना मदत करण्यास शिकवण्यात आले आहे. इच्छा असेल तिथे मार्ग निघतो. इतर लोकांनी सुद्धा आपल्यापरीने मदत करायला हवी, असे ओंकार भागवत सांगतात.

Comments are closed

error: Content is protected !!