पिंपरी,दि.२६(punetoday9news):- सांगवी परिसरात सुरु असलेल्या पोकलॅण्डच्या खोदकामात महावितरणच्या उच्चदाब भूमिगत वाहिन्या तोडल्याच्या दोन प्रकारांमध्ये नवी सांगवी व जुनी सांगवीमधील वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. सांगवी पोलिस ठाण्यामध्ये या दोन्ही प्रकरणात संबंधीत कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपरी विभाग अंतर्गत सांगवी फाटा परिसरातील ढोरे पाटील पुलाजवळ रस्ता रुंदीकरणासाठी पोकलॅण्डने खोदकाम सुरु आहे. त्यात गुरुवारी (दि. 24) सकाळी 9.30 वाजता महावितरणची उच्चदाब वीजवाहिनी तोडण्यात आली. परिणामी जुनी सांगवी परिसरातील सुमारे 12 हजार 500 वीजग्राहकांना सुमारे अडीच तास खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. पुन्हा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. 25) दुपारी 12.30 वाजता नवी सांगवीमधील शितोळे पेट्रोल पंपजवळ ड्रेनेजच्या कामासाठी पोकलॅण्डद्वारे खोदकाम सुरु होते. त्यातही उच्चदाब वीजवाहिनी तोडण्यात आल्याने नवी सांगवीमधील सुमारे 1900 वीजग्राहकांचा वीजपुरवठा 6 तास खंडित होता.
या दोन्ही प्रकारांमध्ये महावितरणचा कोणताही दोष नसताना देखील वीजग्राहकांचा रोष पत्करावा लागला. तसेच तोडलेल्या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचा आर्थिक खर्च आणि वीजविक्रीचे नुकसान देखील सहन करावे लागले. या दोन्ही प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात महावितरणकडून स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधीत कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे.
Comments are closed