पिंपरी,दि.३०( punetoday9news):- पुणे येथील राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक, गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल गिर्यारोहक रोहित वनिता शांताराम जाधव यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज सामाजिक’ ( परिवर्तन दूत ) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र व मानाची शिंदेशाही पगडी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन आयोजित ‘राजर्षी शाहू महाराज महोत्सव २०२१’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रतिवर्षी पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. गिर्यारोहण, सामाजिक क्षेत्रासाठी सातारचे प्रसिद्ध गिर्यारोहक रोहित जाधव यांना परिवर्तनदूत, सामाजिक क्षेत्रात कोल्हापूर येथील डॉ. जयश्री चव्हाण, प्रशासकीय सेवेसाठी पुणे येथील मनपा उपायुक्त नितीन उदास, सातारा येथील ऐतिहासिक क्षेत्रात अजय जाधवराव,
क्रीडा क्षेत्रासाठी मनमाड नाशिक प्रवीण व्यवहारे,रक्तदान कार्यात भूषण सुर्वे, यांना राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले.

याप्रसंगी सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, अपर जिल्हाधिकारी विजय देशमुख, राजेंद्र पवार, संभाजी ब्रिगेड केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर, मारुतीराव सातपुते, बाळासाहेब सोनाळे आदी उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम फेसबुकवर राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या पेजवरून प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास वडघुले, सचिव प्रशांत धुमाळ, युवराज ढवळे, रोहित ढमाले यांनी केले.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!