पिंपरी,दि.६( punetoday9news):- शहरातील लहान मुलांना कोरोना आजाराबाबत सविस्तर माहिती मिळावी, त्यांच्या मनातील कोरोनाबाबतची भीती दूर व्हावी या उद्देशाने लहान मुलांकरीता शालेय विद्यार्थ्यांमार्फत संचालन होणारी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात येत आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून लहान मुलांच्या कोरोना विषयक शंकांचे निरसन होण्यास मदत होईल असे मत महापौर माई ढोरे यांनी केले.
कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनचा शुभारंभ महापौर माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाला त्यावेळी त्या बोलत होत्या.
सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती चंदा लोखंडे, नगरसदस्य तुषार कामठे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड उपस्थित होते. तर हेल्पलाईनचे संचालन करणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक आदी ऑनलाईन उपस्थित होते.
महापौर माई ढोरे म्हणाल्या कोरोनाच्या पहिल्या आणि दुस-या लाटेचा समर्थपणे मुकाबला करत पिंपरी चिंचवड शहर नव्याने उभारी घेत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कोरोनाबाबत विविध उपाययोजना राबविल्या आहेत. नागरिकांच्या सोईसाठी विविध प्रकारच्या हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. दरम्यान कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तविली जात आहे. यामध्ये लहान मुले बाधित होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या मनात कोरोनाची भीती असल्यास ती दूर करण्यासाठी तसेच कोरोनासंबंधी लहान मुलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ७७६८८००३३३ आणि ७७६८९००३३३ या क्रमांकाच्या चाईल्ड हेल्पलाईन सुरू करण्यात येत आली आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी १ वा. दरम्यान ही हेल्पलाईन सुरु राहील. मुलांमध्ये कोरोनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या हेल्पलाईनचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या पाल्यांनी करावा याकरीता पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी यावेळी केले.
उपमहापौर नानी घुले यांनी चाईल्ड हेल्पलाईन हा एक चांगला उपक्रम असल्याचे मत व्यक्त केले. पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले पहिल्या व दुस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या वतीने चांगली उपाययोजना राबविण्यात आल्यामुळे कोरोना संकटाचा सामना करता आला. आता तिस-या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका योग्य त्या उपाययोजना करीत आहे.
विरोधी पक्षनेते राजू मिसाळ म्हणाले, आयुक्त राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. संभाव्य तिस-या लाटेवेळी या चाईल्ड हेल्पलाईनचा अतिशय चांगला उपयोग होणार असून या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
काही महिन्यापूर्वी आपण स्वत: कोरोना बाधित होतो, त्यावेळी आलेले अनुभव आणि माहिती अभावी आलेल्या अडचणी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी विशद केल्या. त्या म्हणाल्या, महापालिकेच्या मी जबाबदार ॲपमध्ये कोरोना संदर्भात विविध माहिती समाविष्ट असून बेड मॅनेजमेंटसह विविध हेल्पलाईन आणि इतर माहिती उपलब्ध असल्याने हा ॲप अधिकाधिक नागरिकांनी डाऊनलोड करावा असे आवाहन त्यांनी केले. कोरोनाबाबत गाफील न राहता सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असेही त्या म्हणाल्या. चाईल्ड हेल्पलाईनचे संचालन करणा-या विद्यार्थ्यांशी देखील प्राजक्ता माळी यांनी ऑनलाईन संवाद साधला.
कोरोना विषयक जागृतीसह आरोग्य विषयक, सामाजिक, शाळेविषयी, खेळाविषयी मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा आणि संवाद साधण्याचा प्रयत्न चाईल्ड हेल्पलाईन द्वारे करण्यात येणार आहे. या हेल्पलाईन द्वारे मुलांच्या प्रश्नांना मुलेच उत्तर देणार आहे. यामध्ये एच ए स्कूल, गेंदीबाई चोपडा शाळा, अण्णासाहेब मगर शाळा, ज्ञान प्रबोधिनी शाळा, सिटी प्राइड स्कूल, थेरगाव माध्यमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी राजे विद्यालय, पिंपळे गुरव शाळा अशा शाळांमधील सातवी ते दहावीचे विद्यार्थी व त्यांचे शिक्षक सहभागी होत आहेत. तसेच महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी व मुलांचे पालक यांचे देखील यामध्ये सहकार्य राहणार आहे.
कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार आयुक्त राजेश पाटील यांनी मानले, सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.
Comments are closed