● पालक १२ जुलै रात्री ११.५५ पर्यंत मत नोंदवू शकतात.
● http://www.maa.ac.in/survey या लिंक वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई,दि.११( punetoday9news):- राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात ८५ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे चित्र आहे. त्यातही ग्रामीण भागातील पालकांचे प्रमाण जास्त आहे.
राज्य शासनाने करोनामुक्त क्षेत्रात प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तर अन्य वर्ग सुरू करण्याबाबत पालक, शिक्षकांचा कल जाणून घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सर्वेक्षण सुरू केले आहे.
सर्वेक्षणाला प्रतिसाद दिलेल्या २ लाख २५ हजार १९४ पालकांपैकी १ लाख १८ हजार १८२ पालक ग्रामीण भागातील, २३ हजार ९४८ निमशहरी भागातील आणि ८३ हजार ६४ शहरी भागातील आहेत. मुलांना शाळेत पाठवण्याची ८४.९७ टक्के पालकांची तयारी आहे, तर १६.०३ टक्के पालकांची मुलांना शाळेत पाठवण्याची इच्छा नाही.
ऑनलाइन शिक्षणासाठी ग्रामीण भागात सुविधा नसताना सर्वेक्षणातील प्रतिसादही ग्रामीण भागातूनच सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. सर्वेक्षणामध्ये पालकांना १२ जुलै रात्री ११.५५ पर्यंत मत नोंदवता येईल. त्यासाठी http://www.maa.ac.in/survey या लिंक वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments are closed