● भविष्यातील वाढती ग्राहक संख्या लक्षात घेऊन दोन नवीन उपविभाग.

पुणे,दि. १५( punetoday9news):- हवेली तालुक्यातील (जि. पुणे) 19 गावे सासवड विभागाला जोडण्यासह व भविष्यातील वाढती ग्राहक संख्या लक्षात घेऊन दोन नवीन उपविभाग निर्माण करून विभागाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणला दिले.

महावितरणच्या सासवड विभागाची पुनर्रचना तसेच भोर उपविभागाचा मुळशी विभागात समावेश करण्याबाबतच्या मागणीच्या अनुषंगाने सह्याद्री राज्य आतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोरचे आमदार संग्राम थोपटे व सासवडचे आमदार संजय जगताप यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे व ऊर्जामंत्री यांचे सल्लागार उत्तम झाल्टे उपस्थित होते तर पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.

आमदार जगताप यांनी मतदारसंघातील वडकी, उरळी देवाची, फुरसुंगी, भेकराईनगर, शेवाळेवाडी, आंबेगाव खु, आंबेगाव बु, उंड्री, पिसोळी, होळकरवाडी, येवलेवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, वडाचीवाडी, भिलेरवाडी, गुजर-निंबाळकरवाडी आदी 19 गावांचा समावेश करून नवीन उपविभाग करण्याची आणि सासवड विभागाची पुनर्रचना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच भोरचे आमदार थोपटे यांनी सासवड विभागाची पुनर्रचना करून यातील भोर उपविभाग वेगळा करून मुळशी विभागाला जोडण्याची मागणी केली आहे.

सध्या भोर उपविभाग बारामती परिमंडळात असल्याने ग्राहकांना अडचणी निर्माण झाल्या असून मुळशी विभागात याचा समावेश झाल्यास ग्राहकांना सोयीस्कर होणार आहे. मुळशी विभाग पुणे परिमंडळात असून याचा फायदा ग्राहकांना होणार असल्याचे संग्राम थोपटे यांनी सांगितले.

 

Comments are closed

error: Content is protected !!