● संरक्षण मंत्रालयाशी समन्वयासाठी नोडल ऑफिसर म्हणून मदत व पुनर्वसन सचिव असिम गुप्ता यांच्यावर जबाबदारी.
●मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवांकडून सातत्याने आपत्कालिन स्थितीचा आढावा.
● बचाव व मदतकार्याला गती देण्यासाठी राज्य व जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न.
● स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधींना सूचना.
मुंबई, दि. 23( punetoday9news):- रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्यात सर्वदूर होत असलेल्या अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार जातीने लक्ष ठेवून आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे तसेच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रीमहोदयांना तसेच लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत.
कोयना धरण परिसरातील अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी वाढत असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने व दरड कोसळल्याने ज्या गावांचा संपर्क तुटला आहे तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनीही आपत्कालिन परिस्थितीत आपापल्या भागातल्या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचाव व मदतकार्यात सहकार्य करावे. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
Comments are closed