कचरा अलगीकरणाचा बोध घेण्याचे इतर नागरिकांना आवाहन. 

● व्हाट्सॲप ग्रुप मार्फत जनजागृतीचा प्रयोग. 

घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी कायदा अंतर्गत कचरा निर्माण करणा-यानेच कचरा अलगीकरण करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी राजीवगांधीनगर झोपडपट्टी परिसरामधील संपूर्ण नागरिकांनी करुन समाजामध्ये एक आदर्श दाखवून दिला.

 

सांगवी,दि.२६( punetoday9news):-  पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील प्रभाग क्रं. ३१ मधील राजीवगांधीनगर मधील रहिवाशांनी १००% कचरा अलगीकरण करून शहरातील इतर नागरिकांसाठी आदर्श निर्माण केला आहे. राजीवगांधीनगर झोपडपट्टी परिसरातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग कर्मचारी यांनी सदर परिसर नुकताच कचराकुंडीमुक्त केलेला आहे. अशी माहिती आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी यांनी दिली. 


राजीवगांधीनगर झोपडपट्टी कचरामुक्त करण्यासाठी व परिसरातील आरोग्य विषयक समस्या जाणून घेण्यासाठी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी मिळून “मिशन राजीवगांधीनगर” या नावाने व्हाट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. सामाजिक बांधिलकीतून  सदर वसाहतीतील काही युवक, नागरिक स्वच्छाग्रही म्हणून काम करण्यास इच्छुक झाले.  प्रभागातील स्वच्छतेसाठी स्वत:हून पुढाकार घेवू लागले. सदर स्वच्छाग्रही नागरिक व आरोग्य निरीक्षक उध्दव डवरी, आरोग्य सहाय्यक रवि रोकडे, आरोग्य कर्मचारी सिध्दार्थ जगताप, विजय केदारी, दिलीप नाईकनवरे, विनोद कांबळे यांनी राजीवगांधीनगर वसाहतीतील प्रत्येक घरात जावून कचरा अलगीकरणाबाबत सूचना दिल्या.


सदर वस्तीमध्ये एकूण १० लहान रस्ते असल्याने त्याठिकाणी घंटागाडी पोहोचणे अशक्य आहे त्यामुळे सदर ठिकाणी वस्तीमध्ये कचरा गोळा करण्याकरिता दोन महिला ढकलगाडीने कचरा गोळा करण्याचे काम करित आहेत.

त्यांचेकडे आज दि.२६ रोजी ५४० किलो ओला कचरा, सुका कचरा अंदाजे ३५० किलो तसेच सॅनिटरी पॅड, डायपर यांसारखा कचरा ७ किलो सदर भागातुन जमा झाला आहे.तीन दिवसांत घरोघरी फिरुन वसाहतीतील जवळजवळ ४०० रहिवाशांनी १००% कचरा अलगीकरण करून स्वच्छ भारत अभियान उद्दिष्टपूर्तीस हातभार लावलेला आहे. जर अशा वसाहतीमध्ये हे घडू शकते तर इतरांनीही वैयक्तिक घरांनी तसेच सोसायटींनी कच-याकडे समस्या म्हणून न पाहता उत्तर शोधले पाहिजे. यापुढे प्रभागामध्ये कचरा अलगीकरण कामकाजाबाबत प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सदर कामकाज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी अनिल रॉय, विजयकुमार थोरात ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी, रमेश भोसले सहा आरोग्याधिकारी आणि महेश आढाव मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

स्वेच्छाग्रही नागरिक प्रतिक्रीया-
नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा म्हणजे नेमके काय तेच माहित नव्हते. कारण बहुतांश लोक ही अशिक्षित आहेत. हवा, पाणी, जमिन यांचेशी कोणतेही वस्तु/पदार्थाचा संपर्क आल्यास जर ती वस्तु कुजते तो म्हणजे ओला कचरा आणि जे कुजत नाही तो म्हणजे सुका कचरा अशा साध्या सोप्या शब्दांत उध्दव डवरी यांनी माहिती दिली. यापुढेदेखील आम्ही स्वच्छतेच्या कार्यात आरोग्य विभागास नेहमीच सहकार्य करु.
आश्विन प्रदीप खुडे 

मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून मला समाजकार्यात काम करत असल्याचा आनंद या माध्यमातुन मिळाला. तरी आमच्या रोजगार निर्माणाकरिता महानगरपालिकेने काहीतरी करावे, आम्ही स्वच्छतेकामी नेहमी कामात पुढाकार घेवू व सोबत काम करु.
करण विजय मिसाळ

कचराकुंडी महानगरपालिकेने काढली. खुप घाण वास परिसरात यायचा. आता कसंलाही त्रास नाही. आाणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करत असताना त्यांच्याही अडचणी समजल्या. कायमस्वरूपी याचे भान लक्षात राहील आणि आम्ही चांगले काम करू.
करण महादेव गायकवाड व अजय देडे .

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!