पुणे मेट्रो रेल प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:
1. देशातील सर्वात हलके मेट्रो कोच:
● कमी वजनाच्याअॅल्युमिनियम बॉडीसह बनलेले.
● डिझाइन गती 95 किमी प्रतितास.
● प्रवासी क्षमता 975 पॅक्स / 3 कार ट्रेन (6 कारसाठी विस्तारित करण्याची क्षमता)
2. सुरवातीपासून सौर ऊर्जेचे एकत्रीकरण:
● 11.19 मेगावॅटएकूण सौर उर्जा स्थापित करण्याची योजना.
● त्यामुळे प्रति वर्षी 20 कोटींची बचत.
● दर वर्षी अंदाजे 25 हजार टन कार्बनडायऑक्साईड उत्सर्जनापासून सुटका.
3. नावीन्यपूर्ण यूजी स्टेशनची रचना: एनएटीएम (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड)
● दोन मेट्रो स्थानके: मंडई व बुधवारपेठ मेट्रो स्थानकांना या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणार.
● या तंत्रज्ञानाच्या वापरामुळं जागेची बचत झाली.
● शहरातील सुमारे 200 रहिवाशांचे पुनर्वसन टाळले.
4.‘कचरे से कांचन तक’डम्पिंग साइटचे डेपोमध्ये रूपांतर :
● कोथरूड कचरा डम्पिंग साइट १२.२ हेक्टर क्षेत्रामध्ये पसरली आहे.
● 3 लाख 80 हजार घनमीटर कचरा असणाऱ्या या जागेची रुपांतर सुंदर परिसरात होणार.
5. कार्यक्षम पाणी व्यवस्थापन :
● सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रीया करण्यासाठी ‘अनॅरोबिक बायोडायजेस्टर तंत्रज्ञाना’चा वापर करण्यासाठी ‘डीआरडीओ’सोबत सामंजस्य करार.
● बहुतांश स्थानकांमधून मनपाच्या गटारलाईनमध्ये सांडपाणी सोडण्यात येणार नाही.
● प्रत्येक स्टेशनवर रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणार.
6. वृक्षारोपण आणि पुनर्रोपण :
● शक्यतो झाडे तोडायची नाहीत ही महामेट्रोची पॉलिसी आहे, नाईलाजाने झाडेकाढण्याची वेळ आल्यास ती न तोडता त्या झाडांच ‘रुट बॉल’ पध्दतीनं पुनर्रोपण करण्यात येते.
● पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 1 हजार 698 झाडांच पुनर्रोपण तर 11 हजार 683 नवीन झाडांची लागवड करण्यात आली.
7. ‘पीपीपी’ तत्वावर पार्किंग कम कमर्शियल डेव्हलपमेंट नियोजित ठिकाण :
● स्वारगेट मल्टी-मोडल ट्रान्सपोर्ट हब – 2.10 दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
● सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्टेशन – 1.02 दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
● रेंज हिल डेपो -2.09 दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
● हिल व्ह्यू कार पार्क डेपो, कोथरूड –1.87 दशलक्ष चौरस फुट क्षेत्र.
पुणे, दि.30 : पुणे ही महाराष्ट्राची शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी आहे. औद्योगिक राजधानी म्हणूनही पुण्याने ओळख निर्माण केली आहे. ऐतिहासिक नगरी म्हणूनही पुण्याकडे बघितले जाते, या ऐतिहासिक नगरीचा, आधुनिक इतिहास लिहिताना पुणे मेट्रो रेल्वेच्या कामाचा, आजच्या ट्रायल रनचाही उल्लेख करावा लागेल. ‘मेट्रो’ मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार आहे. पुण्याच्या विकासाचे आणखी एक स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊन पोहचले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. पुणे मेट्रोने उर्वरीत काम जलद गतीनं पूर्ण करावे, कोणत्याही परिस्थितीत मेट्रोच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील वनाज ते रामवाडी कॉरिडॉरमधील पूर्ण झालेल्या मार्गिकेवरील पुणे मेट्रोच्या ईस्ट-वेस्ट कॉरिडॉरच्या ट्रायल रनचे उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी सात वाजता केले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलमताई गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिदधार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, पुणे मेट्रोची, सगळ्या मार्गांची कामे पूर्ण होऊन, ही मेट्रो सेवा पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानंतर, सायकल, मोटरसायकल, दुचाकीचं शहर अशी ओळख असणारं पुणे शहर, हे मेट्रो वाहतुकीचं शहर म्हणून ओळखलं जाईल. पुणे मेट्रोमुळे रस्त्यांवरचा वाहनांचा, वाहतुकीचा, प्रदुषणाचा ताणकमी होईल. वाहतुक कोंडी सुटण्यास मदत होईल. पुणेकर त्यांच्या निर्धारित ठिकाणी, निर्धारीत वेळेत पोहचू शकतील, दुसऱ्याला दिलेली वेळ आणि वेळेचं गणित, पुणेकर भविष्यात पाळू शकतील, असा विश्वास व्यक्त करतानाच मेट्रो रेल्वेसेवा ही प्रदुषणविरहीत सेवा असल्याने प्रदुषण होणार नाही. रस्त्यांवरची वाहने कमी झाल्याने, त्या माध्यमातून होणारे प्रदुषणही कमी होईल. पुणे शहर आणि परिसरातली वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पुण्याभोवती रिंग रोड करण्यात येणार आहे. वाहतुकीची समस्या हीच पुणे शहाराची प्रमुख समस्या आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून ती काही प्रमाणात निश्चितच सुटेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,पुणे मेट्रो पुणे शहरातून ३३.२० किलोमीटर अंतर धावणार आहे. या मेट्रोलाईनवर ३० मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या एकूण लांबीपैकी, २७.२८ किलोमीटर मेट्रो रस्त्याच्या समांतर पूलावरुन धावणार आहे. तर पुण्याच्या खालून बोगद्यातून ६ किलोमीटर मेट्रो धावणार आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोच एकूण काम जवळपास ६० टक्के पूर्ण झालं आहे. पुणे मेट्रोनं उर्वरीत काम जलद गतीनं पूर्ण करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
प्रास्ताविक महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केले. यावेळी कोरोनाचे निर्बंधाचे पालन करून मेट्रोचे अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Comments are closed