नागपुर,दि.२( punetoday9news):-  नागपुर मध्ये  एका 17 वर्षीय मुलीवर एकाच रात्रीत दोनवेळा दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेगवेगळ्या समूहांनी सामूहिक बलात्कार केल्याची भयानक घटना घडली आहे.

आधी चार आरोपींनी गुरुवारी रात्री पीडित मुलीवर मोमीनपुरा परिसरात एका खोलीत सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर इतर दोन आरोपींनी मेयो रुग्णालया जवळ मेट्रो रेल्वेच्या खाली एका ऑटोत पहाटेच्या सुमारास बलात्कार केला.

नागपूरमध्ये राहणारी एक गतिमंद मुलगी गुरुवारी रात्री तिच्या घरातून निघून गेली होती. रात्रीच्या वेळी ती रेल्वे स्टेशन जवळच्या मानस चौकात आली. तिला नाशिकच्या दिशेने जायचे होते. मात्र, तिच्याकडे तिकीटाचे पैसे आणि तिथे कसे जायचे याबद्दल माहिती नव्हती. मानस चौकात लोखंडी पुलाजवळ अज्ञात टवाळखोर तिची छेड काढत असताना, तिला एका ऑटो चालकाने मी मदत करतो असे खोटे सांगून आपल्या मोमीनपुरा परिसरातल्या रूमवर नेले. तिथे आपल्या इतर ऑटो चालक मित्र आणि रेल्वे स्टेशनवर कुली म्हणून काम करणाऱ्या तीन मित्रांना बोलावले. त्या रूममध्ये चौघांनी तिच्यावर रात्री आळीपाळीने बलात्कार केला. शुक्रवारी पहाटे चार आरोपींपैकी एकाने पीडितेला मोमीनपुरापासून जवळच असलेल्या मेयो रुग्णालयाच्या समोर सोडून दिले.

त्या ठिकाणी सोडून जाणाऱ्या आरोपीने आधीच तिथे असलेल्या इतर दोन आरोपींकडे (पाचवा आणि सहावा आरोपी) सोपवून दिले. त्या दोघांनी तिथे एका उभ्या असलेल्या ऑटोत नेऊन पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. शुक्रवारी सकाळी उजाडल्यावर ती मुलगी रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना दिसली. तेव्हा मुलीने तिला नाशि ला जायचे होते एवढेच सांगितले. त्यामुळे त्या लोकांनी तिला नागपूर रेल्वे स्थानकावर सोडले आणि तिकीटही घेऊन दिले.
रेल्वे स्टेशनवर सकाळच्या वेळेस पीडिता एकटीच रडत बसलेली आढळल्याने रेल्वे अधिकाऱ्यांनी ती अल्पवयीन असल्याने तिला चाईल्ड लाईनच्या हवाली केले. शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवस ती चाईल्ड लाईनकडे राहिली. शनिवारी तिने चाईल्ड लाईनच्या महिला अधिक्षीकेला तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर सामूहिक बलात्काराची ही घटना समोर आली. आधी लोहमार्ग पोलिसांनी (रेल्वे स्टेशनवरील पोलीस ठाणे) तिची चौकशी केली. त्यानंतर आता सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणून सहा आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!