● 41 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मिळालेलं हॉकीतलं ऑलिंपिक पदक.
● भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेनं नवी सुरुवात ठरेल.

मुंबई, दि.५( punetoday9news):- “भारतीय पुरुष हॉकी संघानं संघर्षपूर्ण खेळत ऑलिंपिक कांस्यपदक जिंकल्याबद्दल संघातील खेळाडू, प्रशिक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन. 41 वर्षांची प्रतिक्षा, प्रयत्न, परीश्रमानंतर मिळालेल्या या यशाचा आनंद अवर्णनीय आहे. या पदकानं देशाचा गौरव वाढला असून भारतीय हॉकीच्या ‘सुवर्ण’युगाच्या दिशेनं ही नवी सुरुवात ठरेल.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या भारतीय पुरुष संघाचं अभिनंदन केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भारतीय पुरुष हॉकी संघानं कधीकाळी ऑलिंपिकची आठ सुवर्णपदकं जिंकली होती. 1980च्या शेवटच्या पदकानंतर पदक जिंकण्यासाठी आजपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. गेल्यावेळच्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीविरुद्ध 1-3 अशा गोल पिछाडीवर असतानाही संघानं 5-4 गोलफरकानं मिळवलेला विजय हा दूर्दम्य इच्छाशक्ती, संघभावना, कठोर परीश्रमांचं फळ आहे. भारतीय खेळाडूंनी आज देशवासियांची मनं जिंकली आहेत. मी सर्व खेळाडूंचं, प्रशिक्षकांचं, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफचं अभिनंदन करतो. भविष्यातील सुवर्ण कामगिरीसाठी शुभेच्छा देतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाचं कौतुक केले आहे.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!