● पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवडच्या महापौरांनीही दुकानांची वेळ वाढवण्याची केली मागणी.
● व्यवसायाला बंधने येत असल्यामुळे दुकानदार, व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर.
● व्यावसायिक आंदोलनाच्या पावित्र्यात.
पिंपरी, दि.७( punetoday9news):- राज्य सरकारच्या वतीने मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक सारख्या मोठया शहरांना कोरोना निर्बंधातून दिलासा देत या शहरांमध्ये व्यापारी, दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतु, पिंपरी चिंचवड शहराचा कोरोना वाढीचा दर ३.५३ टक्के इतका कमी असूनही शहरातील निर्बंध अद्यापही कायम ठेवलेले आहेत. ते निर्बंध कमी करून व्यावसायिकांना अधिक वेळ मिळावा अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
खरे पाहता शहराचा कोरोना वाढीचा दर ५ टक्केंपेक्षा कमी असल्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला या निर्बंधातून सुट मिळणे अपेक्षीत होते. कोरोना वाढीचा दर राज्य सरकारने लागू केलेल्या नियमावली नुसार ५ टक्के पेक्षा कमी असताना सुध्दा शहरातील निर्बंध कायम ठेवलेले आहे. पिंपरी चिंचवड शहर हे एक नामांकित औद्योगीक शहर आहे. या ठिकाणी मोठया प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहेत. या कामगारांच्या सर्व साधारण कामाच्या वेळा या सकाळी ७ ते सायंकाळी ६ या दरम्यान असतात. राज्य सरकारने लागू केलेल्या सायंकाळी ४ पर्यंतच्या निर्बंधामुळे या कामगारांना कुठल्याही प्रकारची खरेदी करता येत नाही, तसेच शनिवारी आणि रविवारी सर्वत्र निर्बंधामुळेही खरेदी करता येत नसल्याने कामगारांची तारांबळ उडत आहे. तसेच, शहरातील दुकानांमध्ये दुपारी ग्राहक येत नसल्याने व्यावसायिकांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यवसायाला बंधने येत असल्यामुळे दुकानदार, व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर वाढला आहे. व्यावसायिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत, तर काही ठिकाणी आंदोलने देखील सूरू झालेली आहेत. शहरातील काही भागात छोटे छोटे व्यापारी दुकाने / व्यवसायाच्या माध्यमातून आपला उदरर्निवाह करत आहेत. यातील काही व्यापारी व्यवसायासाठी बँकाकडून कर्ज घेवून तसेच दुकाने भाडेतत्वावर घेवून व्यवसाय करीत आहेत. कोरोना निर्बंधामुळे दुकाने बंद असल्याने हे व्यावसायिक हवालदिल झाले असून त्यांना कर्जाची परतफेड व दुकान भाडे भरणे जिकरीचे झाले आहे. पर्यायाने या व्यावसायिकांचे संपूर्ण कुटुंबच आर्थिक विवंचनेत आलेली आहेत. यामुळे काही व्यावसायिक अगदी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचले आहेत. या सर्व बाबींमुळे शहरातील आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणाम होत असताना दिसून येत आहे. पर्यायाने याचा महापालिकेची कर वसूली, बांधकाम परवाने, इतर कर व परवाने फी वसूली यावर देखिल विपरीत परिणाम झालेला आहे. यामुळे महापालिकेवर सुध्दा कामाचा अतिरिक्त आर्थिक ताण वाढला आहे.
तरी, वरील सर्व बाबींचा विचार करून तसेच कोरोनाचा कमी होत असलेला पॉझीटीव्हीटी रेट, नागरीक / ग्राहकांची होणारी गैरसोय व व्यापारी वर्गात वाढत चाललेला असंतोष लक्षात घेवून शहरातील सर्व व्यवसाय व दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी. अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर माई ढोरे यांनी केली आहे.
Comments are closed