‘एक हात मदतीचा’
● सुमारे साडेतीनशे कुटुंबांसाठी जीवनावश्यक वस्तू महाडकडे रवाना.
पिंपरी,दि.7( punetoday9news):- अतिवृष्टीमुळे कोकणातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वसामान्य लोकांचे संसार उन्मळून पडले आहेत. अशा भागातील लोकांना मदत करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मराठवाडा जनविकास संघ, जय भगवान महासंघ व पिंपरी-चिंचवड हृदय मित्र परिवाराने पुढाकार घेतला आहे. सुमारे साडेतीनशे कुटुंबांना पुरेल इतकी जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत पाठविण्यात आली असून, या वस्तू घेऊन एक टेम्पो महाडच्या दिशेने रवाना करण्यात आला.
पिंपरी गावातील शिवछत्रपती चौक, वाळुंजकर आळी येथे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या हस्ते गाडीचे पूजन करण्यात आले. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगरसेवक संदीप वाघेरे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, गणेश ढाकणे, गणेश वाळुंजकर, कैलास सानप, आनंदा कुदळे, अमोल नागरगोजे, सामाजिक कार्यकर्त्या शारदा मुंडे, अनिता वाळुंजकर, अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संयोजक प्रकाश घोळवे, रोहित राऊत, खंडू खेडकर, सचिन बांगर, संजय किर्तने, पप्पू पालवे, चंदन केदार, गोरक्ष सानप, पिंपरी चिंचवड कार्यवाहक निलेश रायकर, मिलिंद पाटील, गुलाब मराणे, मामा राणे, गौरव वाळुंजकर, प्रसाद कुदळे, राजू शेख, विशाल शिंदे, अमित मोरे, हनुमंत घुगे, अनिता वाळुंज, दीपक सोंजे, प्रदिप सातपुते, अनिल बाविस्कर, सचिन तटकरे आदी उपस्थित होते.
‘एक हात मदतीचा’ या उक्तीप्रमाणे तिन्ही संघटनांच्यावतीने कोकण पूरग्रस्तांना मदत पाठविण्यात आली. यामध्ये अन्नधान्य किट, कपडे, ब्लँकेट, टॉवेल, सॅनिटायजर, हँडवॉश, औषधे आदींचा समावेश आहे. तसेच सूर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, सखाराम वालकोळी, बाळासाहेब धावणे या मित्र परिवाराच्या वतीनेही पन्नास साड्यांची मदत करण्यात आली.
याबाबत पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी सांगितले, की अतिवृष्टीमुळे कोकणातील लोकांचे अतोनात हाल झाले आहेत. प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, मोडका संसार बघण्याव्यतिरिक्त या लोकांकडे काही राहिले नाही. त्यांना मदतीची खूप गरज आहे. कोणत्याही संकटाच्या वेळी मदतीसाठी धावून जाणे, हा महाराष्ट्रधर्म आहे. याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही संघटना मिळून जास्तीत जास्त मदत अडचणीत सापडलेल्या कोकणवासियांसाठी पाठवली आहे. हे स्तुत्य व अनुकरणीय आहे.
Comments are closed