पुणे, दि. 30 : तीन महिन्यांनी आलेल्या
बिलाने ग्राहक गोंधळून गेला आहे त्याविषयी महावितरण कडून वीजबिल योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. लॉआनकडाऊनमुळे मार्चनंतर प्रथमच वापरलेल्या विजेचे प्रत्यक्ष रिडींग जून महिन्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे जूनच्या वीजबिलात लॉकडाऊनच्या कालावधीमधील (सुमारे ९० ते ९७ दिवस) वीजवापरानुसार युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. या युनिट संख्येला सुमारे तीन महिन्यांत विभागून योग्य स्लॅब दरानुसार वीजबिलाची आकारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये एका पैशाचाही अतिरिक्त भुर्दंड लादलेला नाही अशी ग्वाही देत वीजग्राहकांनी विश्वास ठेवावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, जूनमध्ये मीटर रिडींगनुसार देण्यात येणारी वीजबिले अचूकच आहे. केवळ मीटर रिडरकडून अनावधानाने रिडींग घेण्यात काही चूक झाली असल्यासच वीजबिल चुकीचे असू शकते. मात्र महावितरणकडून रिडींगप्रमाणे देण्यात येणारी वीजबिल चुकीचे आहे हा गैरसमज ग्राहकांनी करून घेऊ नये असा स्पष्ट निर्वाळा वीजक्षेत्रातील तज्ञांनी देखील दिला आहे.समजा जूनच्या बिलामध्ये एकूण ६१२ युनिट संख्या नोंदविण्यात आली आहे. तर तीन महिन्यांसाठी प्रत्येकी २०४ युनिटचा वापर झाला आहे असा हिशेब करून त्यातील पहिल्या १०० युनिटला ० ते १०० आणि दुसऱ्या १०४ युनिटला १०१ ते ३०० युनिट स्लॅबनुसार वीजदर लावण्यात येत आहे. यामध्ये आकारणी करण्यात आलेल्या एकूण रकमेत एप्रिल व मे महिन्यांचे वीजबिल भरलेले आहे असा हिशेब करून फिक्स चार्जेस व त्यावरील वीजशुल्क वगळून उर्वरित भरलेली रक्कम वजा करण्यात येत आहे. मात्र एप्रिल किंवा मे महिन्याचे बिल ग्राहकांनी भरलेले नसल्यास ते थकबाकी म्हणून दाखविण्यात येत आहे. याबाबतचा संपूर्ण हिशेब प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे.
वीजग्राहकांनी रिडींगप्रमाणे दिलेल्या वीजबिलांबाबत कोणताही संभ्रम बाळगू नये. एप्रिल, मेमधील लॉकडाऊनचा कालावधी, प्रखर उन्हाळा व सर्वच जण घरी असल्याने वाढलेला वीजवापर आदींमुळे युनिटची संख्या वाढलेली आहे. मात्र २०१९ मधील एप्रिल ते जूनच्या कालावधीतील वीजवापराचा विचार केल्यास यंदाच्या एप्रिल ते जूनपर्यंत तेवढाच वीजवापर झाल्याचे दिसून येत आहे. जूनमध्ये मागील दोन महिन्यांच्या युनिटच्या बिलाची रक्कम लावली असल्याने हे वीजबिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची देखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Comments are closed