● महिला बचत व स्वयंसहाय्यता गटांना रास्त भाव दुकाने परवान्यासाठी अर्ज करण्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे आवाहन.
पुणे, दि.९ ( punetoday9news) :- अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने १ ऑगस्ट २०१७ च्या शासन निर्णयान्वये रद्द केलेली व राजीनामा दिलेली रास्त भाव दुकान परवाने गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार अन्नधान्य वितरण कार्यालय पुणे कार्यक्षेत्रातील गटांना रास्त भाव दुकाने परवाने मंजूर करणेकामी इच्छुक महिला बचत गट व स्वयंसहाय्यता गटांनी संबंधित परिमंडळ अधिकारी यांचे कार्यालयात जाहिरात प्रसिध्द झालेचे दिनांकापासून १० सप्टेंबर २०२१ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन अन्न वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
विहित नमुन्यातील कोरे फॉर्म रक्कम रुपये ५/- इतके शुल्क संबंधित परिमंडळ कार्यालयात जमा केल्यानंतर दिले जाणार आहे. प्रत्येक रास्त भाव दुकान परवाना मिळणेसाठी अर्जदार यांनी स्वतंत्र फॉर्म भरणे आवश्यक आहे. अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, अटी व शर्तीबाबत व इतर अनुषंगिक माहिती परिमंडळ कार्यालयात व अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर पाहावयास उपलब्ध असणार आहे.
रास्त भाव परवाना मंजुरीसाठी गटांची गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे. त्यामध्ये स्वयंसहायता गट अस्तित्वात असलेबाबत बँकेच्या खात्याचे पासबुक/ बचत गट स्थापन बाबतचे बँकेचे पत्र तसेच बचत गट नोंदणी प्रमाणपत्र,स्वयंसहायता गटाची आर्थिक व्यवहाराची माहिती दर्शविणारे प्रपत्र, बँकेचे पासबुक झेरॉक्स (साक्षांकीत केलेले), सभासदांना वाटप केलेले कर्ज व त्याची वसुली केलेबाबतचे बँकेकडील अधिकृत पत्र, स्वयंसहायता गटाकडे खेळते भांडवल असलेबाबतचा पुरावा म्हणून मागणी केलेले ३ वर्षाचे ताळेबंदपत्र व खेळत्या भांडवलाबाबत आवश्यक कागदपत्रे, स्वयंसहायता गटाने/सभासदाने बँकेकडून कर्ज घेतले असल्यास त्याची संबंधीत कागदपत्रे व सदर कर्जाची परतफेड नियमित करत असल्याबाबतचा पुरावा. स्वयंसहायता गट ज्या ठिकाणी परवाना चालविणार आहे. त्याबाबत जागेचा पुरावा म्हणून स्वतःची जागा असल्यास सिटी सव्र्हेचा उतारा तसेच भाडयाची जागा असल्यास मालकाचा सिटी, सर्व्हेचा उतारा व जागा मालकाचे रुपये १०० च्या स्टॅम्प पेपरवर नागरी सुविधा केंद्रामध्ये केलेले संमतीपत्र, इतर वैशिष्टयपुर्ण कामाबाबतचा अहवाल व त्याबाबतचा पुरावा. (राष्ट्रीय राज्यस्तरीत प्रादेशिक स्तरावरील प्रदर्शनामधील सहभाग व इतर शासकीय योजनेमधील सहभाग) या सहभागाबाबत प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण यंत्रणा, जिल्हा परिषद यांचे प्रमाणपत्र तसेच इतर शासकीय योजनेमधील सहभगाबाबत संबंधित जिल्हास्तरीय शासकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र, अर्जदार यांचेकडे मालकीची अथवा भाडे कराराची कमीत कमी २०० चौरस मीटर जागा असलेबाबतचा पुरावा, वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज मुदतीत संबंधित परिमंडळ कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत जमा करावेत.
स्वयंसहायता गटाची निवड करताना महिला स्वयंसहायता गटांना प्रथम प्राधान्य राहील. महिला स्वयंसहायता गट उपलब्ध न झालेस पुरुष स्वयंसहायता गटांचा विचार करण्यात येईल. जेथे स्वयंसहायता गट उपलब्ध होणार नाहीत अशा ठिकाणी शासनाचे ३ जानेवारी २००७ च्या निर्णयात दिलेल्या सध्याचे प्राधान्यसूचीनुसार रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येतील. स्वयंसहायता गटांची निवड करताना ज्येष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या, अंतर्गत व्यवहार पारदर्शकता व परतफेड चोख व नियमित असलेल्या स्वयंसहायता गटांना प्राधान्य देण्यात येईल. निवड करावयाच्या गटांचे हिशोब व लेखे अद्ययावत असावेत व परतफेडीचे प्रमाण किमान ८० टक्के असले पाहिजे.
एकापेक्षा जास्त अर्ज आलेस वरील निकषांचा विचार करुन सर्व अर्जांची छाननी करण्यात येईल. या निकषानुसार रास्त भाव दुकान परवाना मंजूरीसाठी बचत गटांची शासन निर्णयातील तरतुदीनुसार निवड करण्यात येईल. तसेच संपूर्ण कागदपत्रांशिवाय अर्ज स्विकारले जाणार नाहीत. मुदतीनंतर व अपु-या कागदपत्रांसमवेत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे सांगण्यात आले आहे.
जाहिरात
Comments are closed