● ‘भावना’ शॉर्ट फिल्मचे पोस्टर रिलीज.

● सीए अरविंद भोसले यांनी लघुपटातून घेतला स्त्रीयांच्या भावनांचा वेध.

पिंपरी,दि. ९( punetoday9news):- प्रत्येक महिलेला आयुष्यात येणा-या जबाबदा-या यशस्वीपणे पार पाडाव्या लागतात. कुटुंबियांची जीवापाड काळजी घेवून महिलांना नोकरी, व्यवसायही सांभाळावा लागतो.  यावेळी महिलेच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. त्याच भावना समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न ‘भावना’ या शॉर्ट फिल्ममधून केला आहे, असा विश्वास सौंदर्यवती मिसेस युनिव्हर्स, मिसेस इंडिया आणि खडकी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी व्यक्त केला.

रेडबड मोशन पिक्चर प्रेझेन्ट कंपनीच्या वतीने चार्टर्ड अकाऊंटण्ट अरविंद भोसले यांच्या ‘भावना’ या शॉर्ट फिल्मचे पोस्टर त्यांच्या हस्ते रिलीज करण्यात आले. यावेळी पाटील बोलत होत्या. यावेळी ‘भावना’ लघुपटातील मुख्य कलाकार पिया कोसूंबकर, सहकलाकार पूजा वाघ, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे, एचआर पल्लवी कापसे, सीए सिमरन ललवाणी, सैराट आणि फॅण्ड्री या मराठी चित्रपटाचे नृत्य व कला दिर्गदर्शक संतोष संखद, वायसीएम रुग्णालयातील परिचारिका श्वेता जगदाळे, विद्या जाधव, कृषी विभागातील सोनाली भोसले, कलाकार प्रसाद खैरे, चिराग चौधरी, रोहित पवार, बालकलाकार आरव चावक, धनंजय नारखेडे, सीए अरविंद भोसले आदी उपस्थित होते.

प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात अनंत अडचणी येतात. त्यावर मात करून महिला पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. आज प्रत्येक क्षेत्रात महिला यशस्वीपणे कामगिरी बजावताना दिसतात. नोकरी अथवा व्यवसाय करणा-या स्त्रीला घरातील कौटुंबिक जबाबदा-या पार पाडाव्या लागतात. स्पर्धेच्या युगामध्ये हे करत असताना तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. तरी सुध्दा हार न मानता ती पुढे मार्गक्रमण करत असते. स्त्रीया पुरूषांच्या बरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रात कामगिरी बजावत आहेत. तरीही समाजातून स्त्री-पुरूष असा भेदभाव नाहिसा होताना दिसत नाही. पुरूषी मानसिकतेच्या व्यक्तींनी स्त्रीच्या भावना समजून घ्यायला हव्यात. असे झाले तर महिला सर्वच स्तरावर यशस्वी होताना दिसतील. एवढी हिम्मत महिलांमध्ये आहे.

– सहायक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील

 महिलेला तिच्या कठीण काळात मदतीची खरी गरज असते. परंतु, पुरूषी मानसिकेतेने ग्रासलेल्या व्यक्तींकडून महिलेला वारंवार त्रासच दिला जातो. आपल्या घरातल्या महिलेचा –हास आपणच केला आहे. महिलेला तिच्या कलागुणांची पारख करून त्या-त्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिल्यास ती पुरूषांपेक्षा उत्तम कौशल्य दाखवू शकते. महिला चंद्रावरच काय मंगळावर सुध्दा जाऊन आल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करताना दिसतात. त्यामुळे घरातील स्त्रीयांना हुकूम सोडणारी पुरूषी मनोवृत्ती बदलली पाहिजे. ती बदलण्यासाठीच भावना या लघुपटातून स्त्रींच्या जीवनाचा आढावा मांडण्याचे काम कलाकारांनी केलं आहे.

– नृत्य व कला दिर्गदर्शक संतोष संखद

घरात शिक्षणाचा वारसा नसताना कुटुंबातील सदस्यांनी खंबीर साथ दिल्यामुळे डॉक्टर झाले. आताच्या कोविड काळात 24 तास कार्यरत राहावे लागले. कोरोनामुळे मदतीसाठी केव्हाही फोन यायचा. त्यावेळी रुग्णसेवेसाठी आम्हाला रात्री अपरात्रीसुद्धा उपलब्ध राहवे लागायचे. तब्बल पाच महिने कुटूंबीयांनी कोणत्याही गोष्टीची कमी भासू दिली नाही. दरम्यान, मला कोरंटाईन राहावे लागले. त्यावेळी पती आणि मुलांनी खंबीर साथ दिली. अशी साथ प्रत्येक महिलेला तिच्या कुटुंबियांकडून मिळायला हवी. तरच त्या कुटुंबाची प्रगती होते, अन्यथा नाही.

– वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया शिंदे

प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. परंतु, कौटुंबिक व सार्वजणिक जीवनात तिची होणारी घालमेल समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. उलट तिच्यावर बंधणे लादली जातात. तु हेच करायचं, तू तेच करायचं, हे करायचं नाही, अशी बांधणे लादल्यामुळे स्त्री कुटुंबापुरती मर्यादीत राहिली आहे. कुटुंबामध्ये सुध्दा तिच्या भावना देखील ओळखल्या पाहिजे. अशा वेळी तिची होणारी अवस्था ‘भावना’ या शॉर्ट फिल्ममधून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ही फिल्म सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीतजास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.

– चार्टर्ड अकाऊंटण्ट अरविंद भोसले

यावेळी लघुपटातील सर्वच कलाकारांनी आपले अनुभव कथन केले. सीए अरविंद भोसले यांनी आभार मानले.

 

 

Advt:-

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!