दिल्ली,दि.१४( punetoday9news):- भारतात ‘सिंगल युझ प्लॅस्टिक’वर १ जुलै २०२२ पासून बंदी लागू होणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सामानाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्यांची जाडी ३० सप्टेंबर २०२१ पासून ७५ मायक्रॉन आणि ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन असणे बंधनकारक असेल.
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार भारतात १ जुलै २०२२ पासून ‘सिंगल युझ प्लॅस्टिक’वर बंदी असेल. इअरबड्स, प्लॅस्टिक स्टिक, फुगे, प्लॅस्टिक फ्लॅग, कँडी स्टिक, आइस्क्रीम स्टिक यांच्यासह ज्या ज्या वस्तूंसाठी ‘सिंगल युझ प्लॅस्टिक’ अर्थात फक्त एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर होतो अशा सर्व वस्तूंसाठी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी असेल. पुनर्वापर करता येण्याजोग्या प्लॅस्टिकचाच देशात वापर होईल.
‘सिंगल युझ प्लॅस्टिक’च्या आयात (इम्पोर्ट), साठेबाजी (स्टॉकिंग), वितरण (डिस्ट्रिब्युशन), विक्री (सेल्स) आणि वापर (युझ) यावर भारतात १ जुलै २०२२ पासून बंदी असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीचा शुभारंभ झाला. ‘कचरे से कंचन’ अर्थात ‘टाकाऊतून टिकाऊ’ वस्तू तयार करण्यासाठी वाहन स्क्रॅपिंग पॉलिसी सुरू करण्यात आली आहे. एकविसाव्या शतकात भारत कचरामुक्त, स्वच्छ आणि सुंदर व्हावा यासाठी पर्यावरणस्नेही योजना अंमलात आणत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी तसेच देश प्रदूषणमुक्त व्हावा आणि पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यावर भर देत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Comments are closed