शेतकऱ्यांकडे गुंड पाठवणाऱ्या या दुकानचालकास या वर्षी शासनाचा कृषी मित्र पुरस्कार जाहीर झाला असल्याने आश्चर्य व्यक्त. 

नाशिक,दि.१६ ( punetoday9news):- नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील उगाव येथील शेतकऱ्यांना गुंडा मार्फत गलिच्छ शिवीगाळ करण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. या गंभीर प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप व सहकारी कार्यकर्ते यांनी लक्ष घालून पीडीत शेतकऱ्याची भेट घेतली तसेच योग्य कारवाईची मागणी केली आहे. 

प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी गावात जाऊन प्रमुख ग्रामस्थांशी बोलून खरी परिस्थिती समजून घेतली. त्यावेळी त्यांना ही भयानक परिस्थिती समजली. त्यानुसार शासनाच्या वतीने कृषी मित्र पुरस्कार जाहीर झालेला खते, बियाणे विक्री दुकानदार हा पैसे वसुली साठी चक्क गुंडांना नेमून शेतकऱ्यांना धमकावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आत्तापर्यंत सावकारी कर्ज, फायनान्स कंपनी कडून असे वसुली करण्याची पद्धत नागरिकांनी पाहिली होती मात्र चक्क कृषी उत्पादन विक्री दुकानदारही शेतकऱ्यांकडून अशा पद्धतीने वसुली करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

परिस्थिती जाणून घेतल्यानंतर डी.वाय.एस.पी तांबे  यांची ग्रामस्थांसह भेट घेऊन दुकानदारावर कठोर कारवाईची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली. तसेच आज पर्यंत मुख्य आरोपींना अटक न झाल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली .
घडलेला प्रकार अतिशय निंदनीय असून शेतकऱ्यांवर गुंड पाठवणाऱ्या या दुकानचालकास या वर्षी शासनाने कृषी मित्र पुरस्कार जाहीर केला कसा सवाल उपस्थित केला जात आहे . तसेच हा पुरस्कार कोणत्या निकषांच्या आधारे दिला जातो ? याचीही माहिती कृषी विभागाकडे मागण्यात आली आहे.

प्रशासनाने या प्रकरणात कारवाई करण्यात टाळाटाळ केल्यास आम्ही स्वाभिमानीच्या पद्धतीने प्रतिक्रिया देऊ याची जाणीव मी संबधित अधिकाऱ्यांना दिली आहे. शेतकरी एकजूट नाही म्हणून अशा शिव्या सहन कराव्या लागतात. पण इथून पुढे आता सहन केले जाणार नाही.

– संदीप जगताप
प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!