♦ निवडणुकीसाठी आतुर असलेले भावी नेते तर संचारबंदीतही कार्यक्रम घेत पुरस्कार वाटत होते तर काही ठिकाणी अजूनही नियमांचे उल्लंघन करत वाटप चालूच.
♦ पुरस्कार फॅक्टरींची चलती, उकळले जातात चार ते पाच हजार.
♦ तू मला दे मी तुला देतो अशीही पद्धत . याला चाप लावणार कोण ? नीतिमत्तेचा प्रश्न उपस्थित !!
♦ राजकीय , सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात पुरस्कार प्राप्तीसाठीच्या धडपडीची लागली कीड.
♦ या पुरस्कार फॅक्टरी चालवणाऱ्यांची मोठी साखळी शहरात कार्यरत.
पिंपरी,दि.२१ ( punetoday9news):- सद्यस्थितीत गेली एक दीड वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने संपूर्ण देश व नागरिकांचे जीवनमान अस्ताव्यस्त झाले होते . अजूनही काहींचे संसार या कोरोनाचे दुष्परिणाम भोगत आहेत . हाताला काम नाही आणि खिशात पैसा नाही . अशी अवस्था सामान्य नागरिकांची आहे. मागील काळात काही ठिकाणी खूप छान रीतीने मदतकार्य समाजसेवी संस्था, राजकीय संघटना व दानशूर व्यक्तींनी केले. अगदी मदत केल्याची माहिती उजव्या हाताची डाव्या हातालाही कळू नये एवढ्या मोठ्या मनानेही मदत झाली मात्र यातही चमकोगिरी करणे काही ढोंगी व्यक्तींनी सोडले नाही. त्यांच्याकडून “चार आण्याच्या कोंबडीला बारा आण्याचा प्रसिद्धीचा मसाला” लावण्याचा प्रकार करण्यात आला . त्यावरचा कळस म्हणजे स्वतः स्वतःला कोरोना योद्धा पुरस्कार देवून टाकण्यासाठी काही हजारो रूपयांत पुरस्कार वाटणाऱ्या संस्थांकडून पुरस्कार विकत घ्यायला सुरुवात झाली आणि अजूनही ती पद्धत चालूच असल्याचे दिसत आहे.
या पुरस्कार फॅक्टरी चालवणाऱ्यांची मोठी साखळी शहरात कार्यरत आहे. विशेष म्हणजे या पुरस्काराच्या मानचिन्ह व प्रमाणपत्रावर कोणत्याही अधिकृत व्यक्तीची सही नसते. ना अधिकृत संस्थेचा रजिस्टर क्रमांक. ज्या संस्थेच्या नावाने हे पुरस्कार वाटले जातात त्या संस्थेचे कोणतेही ऑडीट धर्मादाय संस्थेकडे सादर करण्यात आलेले नसते. कारण संस्थाच बोगस असते.
मात्र यात अन्याय होत आहे तो खऱ्या कोरोना योद्ध्यांवर कारण चमकोगिरी करणारे असे पुरस्कार वाटताना आपला फायदा पाहत आपले व्यावसायिक हितचिंतक, नातेवाईक, मित्रमंडळीना प्राधान्य देतात. भविष्यातील फायदा लक्षात घेवून अशाच लोकांना पुरस्कार वाटले जातात. त्यात काही ठिकाणी अपवाद वगळता सर्वत्र अंदाधुंद प्रकार चालू आहे. विशेष बाब म्हणजे अशा अनधिकृत संस्थेचे पुरस्कार कार्यक्रम हे सरकारी कार्यालयात, पोलिस स्टेशन, हाॅस्पिटल, सरकारी कार्यालयात , प्रशाशकीय इमारतीत होतात. अशा सरकारी ठिकाणी कार्यक्रम होत असताना संस्थेची अधिकृत माहिती तेथील प्रशासकीय अधिकारी न घेता कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी देतात हे ही आश्चर्य म्हणायला लागेल. शिवाय अशी चमकोगिरी करणाऱ्या दुकानदारांचे फोटो हे सद्यस्थितीतील नियमांचे उल्लंघन करून तोंडाला मास्क, रुमाल न लावता, कसलेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन न होताना पहावयास मिळतात. हा नक्कीच गंभीर व समाजासाठी विघातक विषय आहे. त्यामुळे किमान सरकारी यंत्रणेत कार्यरत असणाऱ्या कर्मचारी व अधिकारी वर्गाने तरी नियमांचे पालन करत योग्य खबरदारी घ्यायला हवी. अन्यथा एकीकडे कोरोना योद्धा पुरस्कार घ्यायचा आणि दुसरीकडे शासकीय नियमांचे उल्लंघन करायचे हे स्वतःच्या कुटुंबासाठी व समाजासाठी घातक ठरेल. त्यामुळे शासनाने अशा कोरोना योद्धा पुरस्कार वाटणाऱ्या संस्थांसाठी नियमावली घाालून देवून त्यांची सरकारी नियमानुसार नोंद ठेवावी अथवा त्यासाठी तशी व्यवस्था करावी जेणेकरून खऱ्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान होऊन समाजात योग्य संदेश जाईल व योग्य कतृत्ववान योद्ध्यांना न्याय मिळेल.
सामाजिक प्रश्नासाठी लढणाऱ्या व कोरोना काळात खरे कार्य करणाऱ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्य, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्तम व महान आदर्शवादी कार्य करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे . कारण पाठीवर शाबासकीचा हात असेल तर कार्य करण्यासाठी अधिक बळ मिळते मात्र तो शाबासकीचा हातच अनधिकृत असेल तर चूकीचा संदेश समाजात जाणार यात तिळमात्र शंका नाही.
Comments are closed