मुंबई ,दि २६( punetoday9news):- मुंबईतील एका महिलेला फेसबुक वर मैत्री करणं चांगलेच महागात पडले आहे.
नेरुळमध्ये राहणाऱ्या या 50 वर्षीय विधवा महिलेने ज्या अनोळखी व्यक्तीसोबत फेसबुकवरुन मैत्री केली , त्या व्यक्तीने सोन्याचे दागिने , घड्याळ , शूज , रोख रक्कम गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने या महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये तब्बल 13 लाख 29 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडून तिची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे . नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
अशी झाली फसवणूक सदर प्रकरणात फसवणूक झालेली 50 वर्षीय विधवा महिला नेरुळमध्ये राहण्यास असून काही महिन्यापूर्वी डॉ . मार्को नावाच्या व्यक्तीने या महिलेसोबत फेसबुकवरुन मैत्री केली होती . त्यानंतर मार्कोने या महिलेसोबत फेसबुकवरुन चॅटिंग करण्यास सुरुवात केली . काही दिवसानंतर या दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिल्यानंतर त्यांनी व्हॉटस्अपवरुन चॅटिंगला सुरुवात केली . त्यानंतर मार्कोने फेसबुकवरुन वैयक्तिक माहिती मिळविली आणि तिला बर्थडे आधीच गिफ्ट म्हणून सोन्याचे दागिने , घड्याळ , लेदर चप्पल , शुज , बॅग आणि रोख रक्कम 37 लाख रुपये पाठविणार असल्याचे सांगितले . तसेच सदर गिफ्टचे फोटो , व्हिडीओ आणि कुरिअरची माहिती देखील त्याने व्हॉटस्अपवर पाठवून दिली .
सदर वस्तू कुरिअरमार्फत पाठवित असल्याचे आणि त्यासाठी ठराविक रक्कम द्यावी लागेल , असे मार्कोने सदर महिलेला सांगितले . त्यानंतर रिषी झा नावाच्या व्यक्तीने या महिलेला संपर्क साधून गिफ्टचे कुरिअर पाठविण्यासाठी 29 हजार रुपये पाठविण्यास सांगितले . त्यानुसार सदर महिलेने 29 हजार रुपये पाठवून दिल्यानंतर रिषी झा याने गिफ्ट म्हणून पाठविलेली 37 लाख रुपयांची युएस डॉलरची रक्कम भारतीय चलनामध्ये रुपांतरीत करण्यासाठी दिड लाख रुपये पाठविण्यास सांगितले . सदर रक्कम देखील या महिलेने पाठवून दिली . त्यानंतर गिफ्टची रक्कम मोठी असल्याचे सांगून त्यासाठी 6 लाख 50 हजार रुपये पाठविण्यास सांगितले . त्यामुळे या महिलेने आपले सोन्याचे दागिने गहाण ठेवले . तसेच मुलाच्या नावाने काढलेली एफडी तोडून या भामट्यांना पैसे पाठवून दिले . त्यानंतर देखील एजंट जय शहा , रिषी झा आणि सुमित मिश्रा या सर्वांनी सदर महिलेला वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठविण्यास भाग पाडले . अशा पध्दतीने या महिलेने एकूण 13 लाख 29 हजार रुपये पाठविल्यानंतर देखील तिला कुठल्याच प्रकारचे गिफ्ट मिळाले नाही .
Comments are closed