सेवाधाम वाचनालय व ग्रंथालयाच्या अध्यक्षपदी धोत्रे
पिंपरी,दि.२८( punetoday9news):- आयुष्याच्या वळणावर डॉ. वाढोकर यांनी बोट धरुन योग्य दिशा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी घडत गेलो. संस्काराची त्यांनी दिलेली ठेव आजवर मला प्रत्येक टप्प्यावर यश देत गेली. पप्पांच्या व आजवर लाभलेल्या सहकार्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आयुष्यात यशस्वी होऊ शकलो, असे मत अखिल भारतीय नाट्य परिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष तथा येथील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी व्यक्त केले.
सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सुरेश धोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
सेवाधाम ट्रस्टचे विश्वस्त डॉ. कृष्णकांत वाढोकर यांनी 1981 साली सुरू केलेल्या सन 2021-2023 या तीन वर्षासाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये कार्यवाह तथा सचिव डॉ. वर्षा वाढोकर, खजिनदार कैलास काळे यांची, तर सदस्यपदी नगरसेवक निखिल भगत, साप्ताहिक अंबरचे उपसंपादक अतुल पवार, डॉ. मिलिंद निकम, राजेश बारणे, अमित बांदल, उर्मिला छाजेड, मीनल कुलकर्णी, पूजा डोळस यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर सल्लागारपदी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, निवृत्त परिवहन अधिकारी हरिश्चंद्र गडसिंग, महाराष्ट्र राज्य बांबू संघटनेचे अध्यक्ष डॉ. हेमंत बेडेकर, लेखक श्रीकृष्ण पुरंदरे, निवृत्त शिक्षिका जयश्री जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना धोत्रे म्हणाले, आज माझ्या वाढदिवशी मला दिलेल्या या संधीचे मी समाजासाठी उत्तम उदाहरण म्हणून सेवाधाम ग्रंथालय व वाचनालय जिल्ह्यात आदर्श ठरेल याकरिता विशेष प्रयत्न करीन.
नूतन कार्यकारीणीच्या संपन्न झालेल्या पहिल्या सभेमध्ये ग्रंथालय संगणीकृत, अद्ययावत करण्याबरोबर सभासद, आजीव सभासद वाढविणे, स्पर्धा परीक्षांचे सभासद व मार्गदर्शन वर्ग सुरू करणे, तसेच विविध उपक्रमांतर्गत वाचक संख्या वाढविणे आदी विषयी अध्यक्ष व संचालक मंडळात निश्चिती झाली.
ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त कै. डॉ. एस. व्ही. गोरे यांना प्रथमत: श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. वाढोकर यांनी नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक ग्रंथपाल बाळासाहेब घोजगे यांनी केले, तर आभार कैलास काळे यांनी मानले.
Comments are closed