● येवला तालुक्यातील हडपसावरगाव येथील प्रकार.

 

नाशिक,दि.२८( punetoday9news):- नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील हडपसावरगाव मधील  तलाठ्याने मुळ मालकाच्या नावावर असलेली आठ एकर जमीन मूळ मालकाच्या वारसदारांना डावलून स्वतः परस्पर नोंदीमध्ये फेरफार करत आपल्या बायकोच्या नावावर केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. संबंधित तक्रारदार महिला वारस नोंदीसाठी गेल्यावर हा प्रकार समोर आला आहे. 

तलाठ्याचा हा प्रताप जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरत आहे. येवला तालुक्यातील हडपसावरगाव मधील मंदा पवार असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. मंदा पवार यांच्या आईचे निधन झाले आणि नंतर वडिलांचे निधन झाल्याने आई-वडिलांच्या नावे असलेले शेत जमिनीला वारस नोंद करण्यासाठी त्या तहसील कार्यालयात गेल्या. तेव्हा त्या शेतजमीनीवर वेगळ्याच वारसाची नोंद झाल्याचे निर्दशनात आले. याची चौकशी केली असता ते वारस दुसरे कोणी नसून वारस नोंद करणाऱ्या  अरुणा जगन्नाथ गांजरे या  तलाठी अतूल थूल यांच्या पत्नी असल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणाची तहसीलदारांकडे तक्रार आल्यानंतर मंडल अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले असून चौकशी अहवाल आल्यानंतर तो जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!