पुणे, दि. ३० ( punetoday9news):- पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेत बारामती तालुक्यातील मोरगाव मधील ऐश्वर्या नेवसे हिने चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय कुस्तीत प्रथम क्रमांक मिळविला आहे तसेच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित २३ वर्षे खालील वयोगटातील मुलीं मधून ऐश्वर्याने बाजी मारली आहे. शालेय अभ्यासासोबत कुस्ती खेळात ऐश्वर्याने सातत्याने यश मिळवले आहे. जिद्द, चिकाटी, गुरू वस्ताद व वडील पहिलवान दत्तात्रय नेवसे यांचे मार्गदर्शन यामुळे ऐश्वर्याने आत्तापर्यंत प्रत्येक कुस्ती स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
परंपरेने कुस्ती खेळ फक्त पुरूषांनी खेळायचा प्रकार म्हणून पाहिला जातो ह्या रूढीवादी विचारसरणीला छेद देत मुलगी ऐश्वर्याची आवड ओळखून वडील दत्तात्रय नेवसे यांनी स्वतः कुस्तीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी चक्क स्वतःच्या घरास व्यायामशाळा बनवले असे म्हणायला हरकत नाही. स्वतः शालेय जीवनात वडील दत्तात्रय नेवसे यांनी कुस्ती, शरीरसौष्ठव स्पर्धा, मल्लखांब, सायकल स्पर्धा यांत प्राविण्य प्राप्त केले आहे.
पारंपारिक कुस्ती सोबत आधुनिक नियमांचे ज्ञान दिले. स्वतः अहोरात्र कष्ट करून जेमतेम आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत मुलगी ऐश्वर्या व मुलगा भूषण या दोघांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले आहे. शालेय जिवनात दोघांनीही शाळेसाठी कुस्ती स्पर्धेतून खूपच चांगली अशी कामगिरी करून कित्येक वेळा प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच शालेय स्तर, तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभागीय स्तरावर चमकदार अशी उल्लेखनीय कामगिरी करून आपल्या पालकांचे व गावाचे नाव रोशन केले आहे. कुस्तीस्पर्धेत सातत्य राखताना सातत्याने व्यायामाचा सराव चालू आहे. योग्य, उत्तम मार्गदर्शनासाठी वडिलांनी बारामती या तालुक्याच्या ठिकाणीही तालमीत शिक्षण दिले.
कुस्ती या खेळ प्रकारात चमकदार कामगिरी करत देशासाठी खेळून पदक प्राप्त करायचे आहे तसेच आई, वडिल व मार्गदर्शकांचे नाव कर्तृत्वाच्या जोरावर उच्च शिखरावर न्यायचे आहे. आज शहरातील मुलींनाही कुस्ती प्रकारात कुटुंबीय पाठवत नसताना ग्रामीण भागातील माझ्या पालकांनी मला या खेळाबद्दल प्रोत्साहन दिले याचा अभिमान आहे.
– ऐश्वर्या नेवसे, कुस्तीपटू.
माझ्या मुलीने कुस्ती खेळात देशासाठी खेळून देशातील इतर मुलींसाठी आदर्श निर्माण करावा अशी इच्छा आहे. अभ्यासासोबत मुलांनी विविध क्रीडा क्षेत्रात जावे. आज काही ठराविक खेळ प्रकार वगळता इतर खेळाकडे खेळाडूंचे व शासनाचेही दुर्लक्ष होते. त्यामुळे आज जागतिक स्तरावर भारताचे नाव होत असताना भारतीय क्रीडा क्षेत्राचेही नाव अव्वलस्थानी जावे असे वाटते.
– दत्तात्रय नेवसे ( पालक व कुस्तीपटू)
Comments are closed