पिंपरी,दि.३०( punetoday9news):- कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून शहरातील गणेशोत्सव उत्साही व आनंदी वातावरणात पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन व महानगरपालिका समन्वय साधून कामकाज करावे असे निर्देश महापौर माई ढोरे यांनी दिले .
तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले . पिंपरी चिंचवड शहरातील यंदाचा गणेशोत्सव कोरोना -१९ विषाणू प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून शांततामय व उत्साही वातावरणात पार पडण्यासाठी महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड पोलिस यांची संयुक्त नियोजन बैठक महानगरपालिका मुख्यालयातील कै . मधुकरराव पवळे सभागृहात पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या .
या बैठकीस महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील , पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश , महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , अप्पर पोलिस आयुक्त संजय शिंदे , सुधीर हिरेमठ , महानगरपालिकेचे उपआयुक्त आशादेवी दुरगुडे , संदीप खोत , सतीश इंगळे , पोलिस उपआयुक्त मंचक इप्पर , आनंद भोईटे , आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे , राजेश आगळे , सोनम देशमुख , सुचिता पानसरे , श्रीनिवास दांगट , सिताराम बहुरे , विजयकुमार थोरात , उमाकांत गायकवाड , सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ . सागर कवडे , प्रेरणा कट्टे , श्रीकांत दिसले , संजय नवलेपाटील , एन.एस.भोसले – पाटील , सह शहर अभियंता संजय कुलकर्णी व इतर अधिकारी उपस्थित होते .
यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी गणेशोत्सवा दरम्यान शहरामध्ये नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करणेसाठी महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांनी समन्वय साधून काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले . या वर्षी कोरोना -१९ विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेवून गणेशोत्सवामध्ये नागरिकांची बाजारपेठांमध्ये तसेच गणेश मंडळांजवळ गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे . पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करण्यासाठी प्रभागस्तरावर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन यांची फिरती पथके नियुक्त करणे आवश्यक आहे . गणेश मूर्ती दान म्हणून स्विकारणा-या वाहनांची योग्य ती सजावट करावी . गणेश मंडळांसोबत प्रत्येक क्षेत्रीय अधिका-यांनी प्रभागस्तरावर बैठकांचे नियोजन करावे . नागरिकांमध्ये गणेशोत्सवाच्या नियमांबाबत जागृती करणेसाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले .
गणरायाच्या दर्शनासाठी नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेवून गणरायाचे ऑनलाईन दर्शनसाठी गणेश मंडळांना आवाहन करणे आवश्यक आहे . पोलिस प्रशासन लवकरच पोलिस स्टेशननिहाय गणेश मंडळांच्या बैठकांचे आयोजन करेल असे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले. घरगुती गणेश मुर्त्यांची संख्या लक्षात घेवून त्या दृष्टीने मूर्तीदान स्विकारणा-या रथांची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे .
नागरिकांमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणेबाबत विशेष जागृती मोहीम राबविण्यात येईल . तसेच कोरोना -१९ विषयक नियमांचे पालन करणेबाबत देखील आवाहन करण्यात येईल असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले .
Comments are closed