शालेय स्तरावर निबंध लेखन , काव्य वाचन , काव्य लेखन , चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन / ऑफलाईन स्वरुपात आयोजन.
मुंबई,दि.१( punetoday9news):- प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्व अनन्यसाधारण आहे . शिक्षक आपल्या अध्ययन अध्यापनातून व्यक्ती , समाज आणि राष्ट्राची निर्मिती करतो . त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन जीवनात यशस्वी होण्यासाठी त्याला प्रेरणा मिळते . शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो .
या दिनानिमित्त सन २०२०-२१ मध्ये Thank A Teacher अभियान राबविले होते , यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी Thank Teacher अभियानांतर्गत शिक्षक कार्य गौरव सप्ताह साजरा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती . शासन निर्णय : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका असते . त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो . तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे व्यक्त करत असतात . सद्यस्थितीत कोविड -१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत . तरी देखील अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना घरी जाऊन , समुह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे . विविध मार्गाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत . अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि .०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ThankA Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे . राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत . या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन , काव्य वाचन , काव्य लेखन , चित्रकला स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन / ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे . तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा . यामध्ये शाळा , विद्यार्थी , पालक , लोकप्रतिनिधी , विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात याव्यात असेही सांगण्यात आले आहे.
Comments are closed