पिंपरी चिंचवड,दि.५  ( punetoday9news):-   मराठवाडा जनविकास संघ महाराष्ट्र राज्य, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि मित्र परिवार यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बीड जिल्हातील घाटसावरगांव परिसर तसेच धाराशिव जिल्हातील विविध ठिकाणच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने 3 वर्षापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते.

संघाचे संस्थापक अध्यक्ष व पर्यावरण प्रेमी ,वृक्ष मित्र अरूण पवार यांच्या नियोजनातून लागवड करण्यात आलेल्या रोपट्यांची योग्य ती देखभाल व संगोपन करण्यात आले होते. उन्हाळ्याच्या दिवसांत संघाद्वारे टँकरद्वारे पाणीपुरवठा करून या झाडांचे जतन केले होते. परिणामतः सध्या या झाडांची चांगल्या प्रकारे वाढ झाली असल्याने ३ वर्षांपासून घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान अरुण पवार यांनी व्यक्त केले. दरम्यान अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षाचे नेते तसेच अन्य संस्था वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करत असतात .मात्र त्यांच्याकडून लावलेल्या झाडांचे जतन करण्याची जबाबदारी पार पाडली जात नाही. त्यामुळे असे कार्यक्रम केवळ प्रसिद्धीच्या उद्देशाने करण्यात आल्याचे नागरिकांच्या नजरेस पडते. मराठवाडा संघातर्फे गेली अनेक वर्षांपासून पुणे,पिंपरी -चिंचवडसह इतर जिल्ह्यातील ठिकाणी वृक्षलागवड करून लावलेल्या झाडांभोवती सरंक्षक जाळी लावून तसेच झाडे मोठी होईपर्यंत टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

“संघाचे सभासद व मित्र परिवाराच्या सहकार्याने वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये टँकरद्वारे पाणी देण्यात आले होते . आज ही झाडे जोमाने वाढून आनंदाने डोलत आहेत. झाडे लावा, झाडे जगवा या उक्तीप्रमाणे वृक्षसेवा घडत आहे. झाडे लावा पण जगविण्यासाठी या हेतूने केवळ वृक्षारोपण करून न थांबता लावलेली झाडे जतन करण्यासाठी प्रयत्न केले जातात”.

– अरुण पवार, वृक्ष मित्र

Comments are closed

error: Content is protected !!