पिंपरी,दि. ७( punetoday9news):- राज्य सरकारने पत्रकारांसाठी घरे मिळावीत, यासाठी स्वतंत्र योजना राबवावी. प्रत्येक पत्रकाराला स्वतःचे हक्काचे घर असावे. शासनाने पत्रकारांसाठी पुणे किंवा पिंपरी चिंचवड शहर परिसरात भूखंड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख व पत्रकार उत्कर्ष समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
याबाबत छावा मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्याशी चर्चा झाली असून, पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांना पत्रकारांसाठी सोयीसुविधांच्या मागण्यांचे निवेदन देऊन पाठपुरावा करणार असल्याचे रामभाऊ जाधव यांनी सांगितले.
वरचेवर महागाई वाढत चालली आहे आणि उत्पन्न घटते आहे. यामुळे अनेक पत्रकार अडचणीत आले आहेत. पैशाचे सोंग आणता येत नाही आणि पत्रकारितेचा घेतलेला वसा टाकताही येत नाही, अशी पत्रकारांची अवस्था झाली आहे. वरचेवर घरभाडे वाढत आहे. त्यामुळे पत्रकारांना हक्काचे घर मिळणे अत्यावश्यक बनले आहे. राज्य सरकार आणि पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका यांनी संयुक्तपणे पत्रकारांच्या घरांसाठी भूखंड उपलब्ध करून दिल्यास अनेक पत्रकारांना हक्काची घरे मिळतील. भूखंड देताना किमान अटी, शर्ती आणि नियम असावेत, जेणेकरून नियम अटींमुळे गरजू पत्रकार घरापासून वंचित राहू नये. तसेच पत्रकारांना आज बँकांमध्ये गृहकर्ज मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र, यावर कोणीच काही भूमिका घेत नाही. पत्रकारांना सहज गृहकर्ज उपलब्ध झाले पाहिजे. शासन व महापालिका यांनी भूखंड उपलब्ध करून दिल्यास अनेक पत्रकारांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग शक्य होईल. यामध्ये प्रिंटमीडिया बरोबरच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनाही लाभ घेता यावा, असेही रामभाऊ जाधव यांनी सांगितले.
Comments are closed