छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे मागणी.
पिंपरी,दि. १८( punetoday9news):- औंध रोडकडून पुणे- मुंबई रस्त्याकडे जाताना रेंजहिल पोलीस स्टेशन येथील रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते. या दरम्यान असलेल्या भुयारी मार्गात मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकी घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. येथील खड्डे बुजविण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत रामभाऊ जाधव यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की औंध रोडकडून पुणे-मुंबई जुन्या महामार्गाकडे जाण्यासाठी महत्त्वाचा भुयारी मार्ग आहे. येथून औंधकडे जाण्यासाठी आणि औंध रोड पुणे विद्यापीठाकडून पुणे-मुंबई महामार्गावर येण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर केला जातो. खडकी स्टेशन, बोपोडी, दापोडीकडे जाण्यासाठी, तसेच शिवाजीनगरकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे वाहनांची नेहमीच या मार्गावर वर्दळ असते. मात्र, या रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने दररोज अपघात घडत आहेत. पावसाच्या पाण्यामुळे दुचाकी घसरून पडून दुचाकीस्वार गंभीर जखमी होण्याच्या घटना दररोज घडत आहेत.
विशेष म्हणजे या भुयारी मार्गामधील खड्डे बुजविण्याचे काम प्रशासनाकडून अनेकदा केले आहे. मात्र, अल्प पावसातच खड्डेच खड्डे पडल्याने प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाचे काम करीत तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविल्याने पावसाचे पाणी भुयारी मार्गात येताच सिमेंट वाहून गेले. परिणामी भुयारी मार्गात खड्डेच खड्डे पडले आहेत. दुचाकीस्वारांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकी घसरून पडण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. वारंवार मागणी करूनही खड्डे बुजविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. येथील खड्डे बुजवून दुचाकीस्वारांचे अपघात घडणार नाहीत, याची प्रशासनाने काळजी घ्यावी. अन्यथा छावा मराठा संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रामभाऊ जाधव यांनी दिला आहे.
Comments are closed