पिंपरी, २४ ( punetoday9news) :-  पिंपरी चिंचवड शहरातील आमदार लक्ष्मण जगताप यांचे अत्यंत विश्वासू व खंदे समर्थक भाजपचे सांगवी काळेवाडी माजी मंडल अध्यक्ष अरुण पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 
         मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हा पक्ष प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी उपसभापती राजू लोखंडे, वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजूअण्णा जगताप, उद्योजक बालाजी पवार, शंकर तांबे, अमोल नागरगोजे, रवी बांगर(उद्योजक), गोरख सानप, सामाजिक कार्यकर्ते किशोर आट्टरगेकर, अमोल लोंढे, सामाजिक कार्यकर्ते अनिसभाई पठाण, विजय वडमारे (अध्यक्ष, धनंजय मुंडे युवा मंच पिंपरी चिंचवड शहर), सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर झुमके, सामाजिक कार्यकर्ते निखिल राक्षे, सामाजिक कार्यकर्ते मारुती कारभारी आदी उपस्थित होते.
    अवघ्या पिंपरी चिंचवडमध्ये 75 हजाराहून अधिक मराठवाडा वासियांशी दांडगा जनसंपर्क आणि जवळपास 700 कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केलेले, तसेच इतर भागातील पिंपरी चिंचवडस्थित नागरिकांसोबत अरुण पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
      अरुण पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशमागे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अरुण पवार यांच्या पक्षप्रवेशामुळे पिंपळे गुरव, सांगवी प्रभागात मताधिक्य निश्चित वाढणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बळ मिळणार आहे.
        बांधकाम व्यवसायिक, उद्योजक आणि सामाजिक कार्यात पुढाकार असल्याने महाराष्ट्रात काहीही नैसर्गिक आपत्ती किंवा काही संकट असेल तर मराठवाडा जनविकास संघ आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून सोडवले जातात. अरुण पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाला मोठे बळ मिळणार आहे, तर आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अरुण पवार मुळे मोठे संघटन असलेला नेता मिळाला असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
        भाजपचे सक्रिय पदाधिकारी या नात्याने अरुण पवार यांनी अनेक विधायक उपक्रम राबवले आहेत. ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ या न्यायाने अरुण पवार यांनी तळमळीने पक्षसंघटन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अलीकडच्या काळात पक्षातील विचारधारेमुळे त्यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय घेण्याआधी मित्र, वरिष्ठ नेतेमंडळी, पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्ते, त्यांना मानणारा मोठा वर्ग या सर्वांचे मत जाणून घेतले. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पर्याय अरुण पवार यांच्यासमोर होते. याच दरम्यान माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची शिष्टाई कामी आली आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे धर्मनिरपेक्ष विचार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराचा झपाट्याने केलेला विकास, सामाजिक, राजकीय कर्तृत्व लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला.
       अरुण पवार यांचे पिंपळे गुरव परिसरात वीस वर्षापासून वास्तव्य आहे. या वीस वर्षात 25 हजार हून अधिक झाडे लावून त्यांचे संगोपनही करण्यात आले आहे. याबरोबरच पंचवीस हजाराहून अधिक रोपांचे मोफत वाटपही केलेले आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये झाडांना पाण्याची आवश्यकता असेल, तर  टँकरद्वारे पाणी मोफत पुरविले जाते. त्यामुळे मोठा जनसंपर्क वाढत गेलेला आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे.
         पिंपरी चिंचवड शहरात मराठवाड्यातील अंदाजे 3 लाखाच्या पुढे नागरिक वास्तव्यास असून, या नागरिकांच्या प्रत्येक सुख दुःखात सहभाग असतो. पवार यांचा अरुण कन्स्ट्रक्शन प्रमोटर्स अँड बिल्डर्स या नावाने व्यवसाय असून, मराठवाडा परिसरातील बांधवांसाठी हक्काची घरे मिळावीत, यासाठी प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी दरवर्षी प्रयत्न करतात. तसेच दरवर्षी मुलांसाठी दानपेटी नव्हे, तर ज्ञानपेटी हा उपक्रम राबविला जातो. गोरगरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत वह्या व पाठ्यपुस्तके वाटप, पिंपळे गुरवमधील ममता अंध अनाथ शाळेतील मुलांना दरवर्षी धान्य व शालेय साहित्याचे वाटप, मोफत नेत्र चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर, परिसरातील कचरा वेचणाऱ्या व घंटागाडीवर काम करणाऱ्या बंधू-भगिनींना मिठाई व कपडे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर, वृक्ष संवर्धन व वृक्ष संगोपन, पशुधन वाचवा अभियान, स्वच्छता अभियान, उस्मानाबाद जिल्ह्यात वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे 105 हौद बांधले, त्याबरोबरच भंडारा डोंगर, मरकळ, भूम, तुळजापूर आदी ठिकाणी 25 हजार रोपांची लागवड व त्यांचे टँकरद्वारे पाणी देऊन संगोपन, राम मंदिर व किल्ले संवर्धनासाठी 51 हजार रुपयांची मदत, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या परिवाराला आर्थिक मदत, दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्याग्रस्त शेतकरी व शहीद जवान यांच्या कुटुंबियांना मोफत बियाणे वाटप, दरवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे आयोजन आदी विविध उपक्रम अरुण पवार राबवित असतात.

Comments are closed

error: Content is protected !!