शालेय जीवनात अधिकारी होण्याचे बघितलेले स्वप्न प्रत्यक्षात.
पिंपरी,दि.२८ ( punetoday9news):- शालेय जीवनात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगलेल्या माधुरी भानुदास गरुड हिने केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत 561 वी रँक प्राप्त केली. यंदा यूपीएससी उत्तीर्ण होणारी पिंपरी-चिंचवडमधली ती पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.
माधुरीने मिळविलेल्या यशाचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व वृक्षमित्र अरुण पवार माजी उपसभापती राजू लोखंडे, अखिल वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय जगताप, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र टेंबे यांनी कौतुक करीत अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दहावीमध्ये तब्बल ९४ टक्के गुण मिळविल्यानंतरही तिने अकरावीला पुण्यातील महाविद्यालयामध्ये कला शाखेत प्रवेश घेतला. शालेय जीवनापासून अधिकारी होण्याचे स्वप्न बघण्यास सुरवात केली व स्वप्नांचा पाठलाग सुरू ठेवला. आई गृहिणी आणि वडील सेल्स टॅक्स विभागात नोकरीला असलेल्या घरात माधुरीने केवळ कठोर परिश्रम व इच्छाशक्तीच्या जोरावर लाल दिव्याची गाडी मिळवून दाखवली आहे.
पदवीनंतर मानव्यशास्त्र, राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. कायद्याचे शिक्षण (लॉ) घेतले. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात अभ्यास करताना सारथी संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली. आपल्या यशात आई, वडील, भाऊ आणि जवाद काझी यांचा मोठा वाटा असल्याचे माधुरी सांगते.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता आई-वडिलांचे पाठबळ फार मोलाचे ठरले. शालेय जीवनात व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन मिळाल्याने जिद्द, परिश्रम, चिकाटी व अभ्यासातील सातत्यामुळे यश गाठता आले. स्पर्धा परिक्षेसाठी सातत्य आणि जिद्द कायम ठेवल्यास यश नक्कीच मिळते. आई बाबांनी गेल्या दोन वर्षात एकही काम सांगितले नाही, इतका पाठिंबा दर्शवला. मी शिकून मोठ्या पदावर काम करावे, अशी माझ्या आई-बाबांची तीव्र इच्छा होती. आज ती पूर्ण झाल्याने, भरपूर आनंद झाला आहे.
अभ्यासात सातत्य ठेवून, नियोजन केल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवता येईल. त्यासाठी आपले छंद सोडण्याची आवश्यकता नाही. आपला भरतनाट्यम आणि झुंबा डान्स, वाचनाचा छंद जोपासत अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान आत्मचरित्रे खूप वाचली. सचिन तेंडुलकर, मिशेल ओबामा, इंद्रा नुयी, बेंजामिन फ्रॅंकलिन, हिटलर, महात्मा गांधी अशा थोरा मोठ्यांची आत्मचरित्रे वाचली. मोठ्यांकडून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो. त्यांचं ऐकलं तर आयुष्यात खूप पुढे जाता येते, असे माधुरी सांगते.
सोशल मीडियाचा अगदी कामापूरता वापर केला. तरूणाईने गरजेपुरता सोशल मीडियाचा वापर केल्यास उर्वरित वेळ सत्कारणी लागेल, असेही माधुरीने सांगितले.
Comments are closed