पुणे,दि.2 ( punetoday9news):- मराठीतीली ज्येष्ठ साहित्यिक, विनोदी लेखक आणि कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी पुण्याच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. द मा मिरासदार यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रचंड गाजल्या. मिरासदार यांचा जन्म 14 एप्रिल 1927 रोजी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं झाला होता.

काही वर्षे पत्रकारिता, नंतर अध्यापन क्षेत्रात प्रवेश
दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांनी काही वर्षे पत्रकारीता केल्यानंतर त्यांनी 1952 साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने 1962 सालापासून कथाकथन करुन महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे 24 कथासंग्रह, 18 विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती.

दोन चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिके
मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर असत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले. तसेच अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. एक डाव भुताचा आणि ठकास महाठक या दोन चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली होती.

‘व्यंकूची शिकवणी’ या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरुन गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. मराठी साहित्यिकांनी विनोदी वाङ्मयात ज्या अजरामर कथा लिहिल्या त्यात द. मा.मिरासदार यांची ‘माझ्या बापाची पेंड’ आणि ‘भुताचा जन्म’ यांचा समावेश व्हायला हरकत नाही. ‘मिरासदारी’ या पुस्तकातली ‘भुताचा जन्म’ ही कथा प्रसिद्ध आहे. ही लोकप्रिय कथा बारावीच्या अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात घेतली आहे.

‘भुताचा जन्म’ शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली
द.मा.मिरासदार यांच्या ‘भुताचा जन्म’ या कथेवर बनलेली शॉर्ट फिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये होणाऱ्या फेस्टिवलमध्येही दाखवली गेली. द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक.
मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी गावरान पात्रे
गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत.
मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. त्याचप्रमाणे त्यांनी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. द. मा. मिरासदार हे नेहमीच त्यांच्या मार्मिक आणि शैलीदार विनोदांसाठी प्रसिद्ध राहिले आहेत.
महाराष्ट्रातील विविध गाव आणि तिथे राहणारी माणसं आपल्याला नेहमी मिरासदारांच्या कथेतून भेटत राहतात. ‘चकाट्या’मध्ये ही अशाच काही गावात आणि शहरात राहणाऱ्या अवली माणसाच्या आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात. फक्त शाब्दिक विनोद न करता प्रासंगिक विनोद लेखनातून वठवणे आणि साध्या लिखाणातून वाचकाला गुंतवून ठेवणे यातच लेखकाचे यश मानता येईल. ‘शिवाजीचे हस्ताक्षर’ ही कथा तर अप्रतिम. द. मा. मिरासदार यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, पुलोत्सव जीवनगौरव’ पुरस्कार मिळाला आहे. रवींद्र मंकणी हे द. मा. मिरासदार यांचे जावई होत. द. मा. मिरासदार यांना भावपूर्ण श्रध्दांजली.

 

 

Comments are closed

error: Content is protected !!