पिंपरी,दि.६( punetoday9news):- कुदळवाडी आणि चिखलीमध्ये स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या पुढाकाराने शिवांजली सखी मंच यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाच्या निमित्ताने पाककला प्रशिक्षण वर्ग, सामाजिक पुरस्कार, आरोग्य जनजागृती मार्गदर्शन आदी उपक्रम राबविण्यात येणार असून, या निमित्ताने आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे.
नगरसदस्य दिनेश यादव फाऊंडेशन आणि मित्र मंडळाने या उत्सवाचे आयोजन केले आहे. दिनेश यादव यांच्यातर्फे गेल्या दीड वर्षात लसीकरण केंद्र,आधार केंद्र,कोरोना काळात मोठ्या प्रमाणात मदत करण्यात आली असून, यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने समर्थक आणि कार्यकर्ते यांच्यात उत्साह संचारला आहे.
दुर्गाशक्ती नागरिकांचे मनोबल वाढवेल:दिनेश यादव
गेली अनेक वर्षे मी कुदळवाडी भागात सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करत आहे. गेली दीड वर्षे आपण महामारीच्या वेढ्यात अडकून पडलो होतो. सध्या थोडासा दिलासा मिळाला असून, नागरिकांच्या मनातून भीतीचे सावट दूर करण्यासाठी आदिशक्तीचा जागर आयोजित केला आहे. ही दुर्गेची शक्ती नागरिकांना नक्कीच मनोबल वाढवायला मदत करेल, असे मला वाटते. या पुढील काळात चिखली भागात विकासाचे नवीन पर्व तसेच सुनियोजित पद्धतीने नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडवायला आपण प्राधान्य देणार असल्याचे दिनेश यादव यांनी स्पष्ट केले आहे. तर नवरात्र उत्सव सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर करून साजरा करावा, असे आवाहन आहे.
Comments are closed