ऋतुराज गायकवाडला सामनावीर पुरस्कार मात्र सर्वत्र चर्चा फक्त धोनीची !
दुबई :- आयपीएल स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या हंगामातील प्लेऑफ सामन्यांमधील पहिला सामना रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला . या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर 4 विकेट्सने मात केली. त्याचबरोबर क्रिकेटरसिकांना चेन्नईच्या रुपात यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. दिल्लीवर मात करत चेन्नईने फायनलचं तिकीट मिळवलं तर चेन्नईने आयपीएलच्या इतिहासात नवव्यांदा फायनल गाठली आहे.
या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 172 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी चार विकेट्स आणि 2 चेंडू राखून हे आव्हान पूर्ण केलं आहे. सुरुवातीला ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने या सामन्यात शतकी भागिदारी करत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात धुवांधार फलंदाजी करत कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्यावर कळस चढवला. धोनीने त्याच्या आक्रमक शैलीत ही मॅच फिनिश केली. धोनीने 6 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावा जमवल्या.
अखेरच्या षटकात विजयासाठी 6 चेंडूत 13 धावांची आवश्यकता होती. टॉम करनने पहिल्याच चेंडूवर मोईन अलीला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर धोनी स्ट्राईकवर आला. त्यानंतर त्याने सलग दोन चौकार लगावले. दबावात आलेल्या टॉम करनने पुढचा चेंडू वाईड टाकला. चेन्नई समर्थकांचं टेन्शन आणखी कमी झालं. त्यानंतरच्या चेंडूवर धोनीने आणखी एक चौकार लगावत सामना जिंकला. ऋतुराज गायकवाडला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले खरे मात्र सर्वत्र चर्चा फक्त मॅच फिनिश करणाऱ्या धोनीचीच सुरु आहे.
Comments are closed