मुंबई, दि. 28 ( punetoday9news):- जिंजी (तामिळनाडू) किल्यातील ज्या सदरेवरून राजाराम महाराजांनी स्वराज्याचा कारभार आठ वर्षे चालवला, त्या सदरेच्या जतन संवर्धनासाठी राज्य शासनामार्फत 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
तामिळनाडूतील जिंजी किल्ला स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखला जातो. छत्रपती राजाराम महाराज यांनी आठ वर्षे येथून स्वराज्याचा कारभार पाहिला. या किल्ल्यावरील राजाराम महाराजांच्या राजसदरेच्या जतन व संवर्धनासाठी 50 लाख रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी गड-किल्ले संवर्धन आणि विकास समितीच्या बैठकीत विशेष आमंत्रित सदस्य छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या राजसदरेच्या संवर्धनासाठी 50 लाख रूपयांचा निधी केंद्रीय पुरातत्व खात्याकडे तात्काळ वर्ग करण्यास मंजूरी दिली.
गड किल्ल्यांचे जतन करणे व संवर्धन करणे, त्या परिसरात पर्यटन सुविधा निर्माण करणे व त्या परिसरातील जैवविविधता जतन करणे व वनीकरणे करणे या कामाचे संनियंत्रण करण्यासाठी 1 जुलै 2021 रोजी सुकाणू समितीचे गठन करण्यात आले आहे. या सुकाणू समितीममार्फत पहिल्या टप्प्यात राजगड, तोरणा आणि शिवनेरी (पुणे जिल्हा), सुधागड (रायगड जिल्हा), सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग (सिंधुदुर्ग जिल्हा) या किल्ल्यांच्या जतन, संवर्धन, जैवविविधता आणि पर्यटन सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या कामांचे सनियंत्रण करण्यासाठी सुकाणू समिती करण्यात आली आहे. या समितीने सर्वप्रथम 6 किल्ल्यांसाठी 6 स्वतंत्र समिती स्थापन कराव्यात. तसेच या समितीमध्ये गड संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांना सामावून घ्यावे. याबरोबरच संवर्धन करीत असताना प्रत्येक गड किल्ल्यासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यात यावा. या आराखड्यामध्ये प्रामुख्याने गड -किल्ल्यांचे संवर्धन,जतन आणि रक्षण करीत असताना मूळ वास्तूला कोठेही धक्का लागणार नाही अशा पद्धतीने संवर्धनाचे काम कसे करण्यात येणार आहे याबाबतचा आराखडा तयार करण्यात यावा. गड-किल्ले संवर्धनाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची तरतूद, काम पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी आणि संवर्धन करताना वापरण्यात येणारे साहित्य याची माहिती सुद्धा समितीने समोर आणणे आवश्यक आहे. असे सांगण्यात आले.
संवर्धन विकास आराखड्यांमध्ये संवर्धन आणि विकास कार्यक्रमांबरोबर या 6 किल्ल्यांवरील स्वच्छता अभियान, जनजागृती कार्यक्रम, या किल्ल्यांबाबत छायाचित्रण स्पर्धा, किल्ल्यांसंबंधी संपूर्ण माहिती देणारे ॲप विकसित करणे, माहितीपट तयार करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे.तसेच पर्यटकांच्या दृष्टीने आवश्यक सुविधा गडांच्या पायथ्याशी निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्यक जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. या सहा किल्ल्यांवर पदपथ दुरुस्ती, मर्यादित वास्तुसंवर्धन, स्वच्छता मोहीम, जनजागृती अभियान याबरोबरच माहिती पुस्तिका तयार करणे, आणि युनेस्कोच्या दर्जाचा सर्वंकष विकास आराखडा तयार होणे आवश्यक आहे. या दृष्टीने पर्यटन आणि वन विभागाने सांस्कृतिक कार्य विभागाला आराखडा द्यावा जेणेकरुन या सर्व सुविधा येथे निर्माण करता येतील असेही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
Comments are closed