पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (वय ५४) यांचे आज शनिवारी(दि ४) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. साने यांना २५ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.
साने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. चिखली परिसरातून तीनवेळा ते निवडून आले होते. लॉकडाउन कालावधीत त्यांनी नागरिकांना मोठी मदत करत अन्नधान्यांचे वाटप केले होते. त्यांचा त्यादरम्यान नागरिकांशी संबंध आला होता. दत्ताकाका या नावाने ते संंपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात परिचित होते.
२५ जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर चिंचवड येथील बिर्ला रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. साने यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात सर्वानाच धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. साने हे राष्ट्रवादीचे धडाकेबाज नगरसेवक होते. त्यांनी अनेकदा महापालिकेतील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आणली होती.
Comments are closed