पिंपळे गुरव , पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, जुनी सांगवी व नवी सांगवी मधून फक्त पाचच स्टाॅल धारकांकडे फटाके विक्री परवाना तर इतर सर्व फटाके स्टाॅल बेकायदेशीर असल्याची गंभीर बाब समोर.
● प्रशासनाला नियमांचा विसर ; नागरिकांच्या जीवाशी खेळ.
● 95 % फटाके स्टाॅल रहदारीच्या ठिकाणी; आपत्ती विषयक सूरक्षा यंत्रणाही उपलब्ध नाहीत.
● आग लागून गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास जबाबदार कोण?
सांगवी , दि.१( punetoday9news):- महापालिका क्षेत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार , फटाके विक्री दुकानांसंदर्भात धोरण असून , त्याची अंमलबजावणी करावी लागते . रहिवासी भागात फटाका विक्री दुकानांना परवानगी देण्यात येत नाही. शहरात फटाक्यांच्या विक्रीसाठी अग्निशमन विभागाकडून परवानगी देण्यात येते. मात्र या वर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील बहुसंख्य भागात बेकायदेशीर फटाका स्टाॅल उभारले असून कसल्याही प्रकारचे सुरक्षा विषयक नियम पाळले जात नाहीत.
तीन दिवसांपूर्वीच पिंपळे गुरव- दापोडी रस्त्यावर बर्निंग बस चा थरार लोकांनी भर दिवसा अनुभवला असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र अशा प्रकारे बेकायदेशीर फटाका स्टाॅल रहदारीच्या, गर्दीच्या ठिकाणी लावल्याने अशी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची कल्पना असतानाही महानगरपालिका, अग्निशमन यंत्रणा व पोलिस प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.
प्रशासनाकडून दरवर्षी फटाके स्टाॅल धारकांना परवाना काढण्याचे आवाहन करण्यात येते मात्र परवाना काढण्यासाठी धावपळ करण्यापेक्षा बेकायदेशीर स्टाॅल चालवण्यास हे स्टाॅल धारक प्राधान्य देत असल्याने नागरिकांच्या व लहान मुलांच्या जीवाशी उघडपणे खेळ केल्याचा गंभीर प्रकार होत आहे.
फटाके स्टाॅल वर विक्रीस ठेवताना ही प्रशासनाने काही नियम ठरवून दिले आहेत.
तात्पुरता फटाका स्टॉल नियमावली
● फटाका जास्तीत जास्त साठा व मर्यादा 50 किलो
● स्टॉलवर वाळू , पाण्याच्या बादल्या व अग्निशामक साधने असावीत .
● 200 लिटर पाणीसाठा असावा.
● शोभेच्या दारूव्यतिरिक्त कोणत्याही वस्तूची विक्री करू नये.
● जलद ज्वालाग्राही फटाके स्वतंत्र पॅकिंगमध्ये ठेवावे.
● धूम्रपान निषेध फलक ठळक इंग्रजी / मराठी भाषेत लावावा .
● फटाक्यांची मांडणी दुकानाचे शटरबाहेर करू नये.
● रस्त्यावर अतिक्रमण करू नये.
● स्फोटक , ज्वलनशील , पेट्रोलजन्य पदार्थ स्टॉलजवळ ठेवू नये .
●लहान अपंग , अपरिचित व्यक्तीला स्टॉलवर बसवू नये.
● फटाका स्टॉलचे नाव ठळकपणे दिसेल असा बोर्ड असावा.
● फटाका स्टॉलसाठी पोलिस , महापालिका , अग्निशामक दलाची परवानगी असावी.
● शेजारच्या नागरिकांनी तक्रार केल्यासही परवाना रद्द करण्यात येवू शकतो.
वरील नियमांची पूर्तता न करता नियमांची पायमल्ली होत असल्याची वास्तविकता पिंपरी-चिंचवड शहरातील फटाका स्टाॅलवर दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच जागे होवून कारवाई करणे आवश्यक आहे.
बेकायदेशीर फटाका स्टाॅल वर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
– सुनील टोणपे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस स्टेशन.
Comments are closed