चाकण,दि.१( punetoday9news):-  चाकणजवळील कुरळीमध्ये एस. एल. ॲग्रो फुडस् शीतगृहासाठी रिमोटद्वारे सुरु असलेली एक लाख रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. मीटरमध्ये वीजवापराची नोंद होऊ नये यासाठी रिमोट बसविल्यानंतर अवघ्या १९ तासांमध्ये ही वीजचोरी उघड झाली. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकणजवळील कुरुळी (ता. खेड) येथे एस. एल. ॲग्रो फुडच्या शीतगृहासाठी महावितरणकडून उच्चदाब वीजजोडणी देण्यात आली आहे. पुणे ग्रामीण चाचणी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी. एन. भोसले यांनी या वीजजोडणीची वार्षिक पाहणी केली असता त्यांना वीजसंचाच्या मांडणीमध्ये संशय आला. त्यांच्यासह राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता संदीप दारमवार, सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांनी वीजयंत्रणेची पाहणी व तपासणी केली. यावेळी वीजवापरकर्ते मदन केशव गायकवाड व पंच उपस्थित होते.

या तपासणीमध्ये शीतगृहातील वीज यंत्रणेत फेरफार करून दोन इलेक्ट्रॉनिक्स किट बसविल्याचे व त्याआधारे रिमोटद्वारे वीजवापराची नोंद होणार नाही अशी तांत्रिक व्यवस्था केल्याचे आढळून आले. वीजचोरी सुरु असल्याचे आढळून आल्यानंतर पंचनामा करण्यात आला व दोन इलेक्ट्रॉनिक्स किट व इतर साहित्य जप्त करण्यात आले. वीजचोरी उघडकीस येण्यापूर्वी १९ तासांच्या कालावधीमध्ये रिमोटद्वारे मीटरमधील वीजवापराची नोंद थांबविण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामध्ये १ लाख ४१० रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वीजवापरकर्ते मदन केशव गायकवाड विरुद्ध चाकण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कलम १३५, १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!