पुणे : पुणे , मुंबईत ईव्हीएमवर निवडणुका यशस्वी झाल्याने सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांची निवडणूक ईव्हीएमवर घेण्याचा प्रस्ताव आहे .
राज्यातील सहकारी गृहनिर्माण , बँका , सूतगिरण्या आणि साखर कारखाने अशा सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच इलेक्ट्रॉनिक व्र्होंटग मशिनवर ( ईव्हीएम ) घेण्यात येणार आहेत .
याबाबत सहकार निवडणूक प्राधिकरणाने पाठवलेल्या प्रस्तावाला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत ईव्हीएम खरेदीसाठी निधी देण्याची ग्वाही दिली आहे . त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच काही तासांत लागू शकणार आहेत .
मतपत्रिकेद्वारे मतदान आणि मतमोजणी होत असल्याने या दोन्ही प्रक्रियांसाठी वेळ लागतो . काही सहकारी संस्थांसाठी पसंतीक्रम पद्धतीचा अवलंब केला जातो . परिणामी मतमोजणी होऊन निकाल लागण्यास काही वेळा एक दिवस , तर कधी दोन दिवसांचा कालावधी लागतो . त्यामुळे ही पद्धत बंद करून लोकसभा , विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणे मतदान आणि मतमोजणीसाठी ईव्हीएमचा वापर केल्यास मतदानमोजणी प्रक्रिया सोपी होणार आहे.
प्राधिकरणाने शासनाकडे साडेआठ ते नऊ कोटी रुपये निधीची मागणी केली आहे . त्यापैकी पहिल्या टप्प्यात येणाऱ्या निधीतून काही ईव्हीएम खरेदी केली जातील . त्यानुसार लहान सहकारी संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमवर घेता येऊ शकतील .
मुंबई जिल्हा उपनिबंधक कार्यालय एक अंतर्गत येणाऱ्या रिझर्व्ह बँक स्टाफ ॲन्ड ऑफिसर्स को – ऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक ईव्हीएमद्वारे घेण्यात आली होती . प्रायोगिक तत्त्वावर झालेली ही निवडणूक यशस्वी झाली होती .
राज्यात विविध प्रकारच्या दोन लाख ५८ हजार सहकारी संस्था आहेत . त्यामध्ये सहकारी साखर कारखाने , जिल्हा मध्यवर्ती बँका , सहकारी सूतगिरण्या , पतसंस्था , जिल्हा मध्यवर्ती ग्राहक संस्था , सहकारी रुग्णालये , शैक्षणिक संस्था आणि खरेदी – विक्री संघ यांचा समावेश आहे . या संस्थांच्या निवडणुकांवरून कायम आरोप – प्रत्यारोप होत असतात . काही गैरप्रकार झाल्याच्या तक्रारीही प्राप्त होतात . त्यामुळे ईव्हीएमचा वापर केल्यास निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता येऊन मतदान आणि मतमोजणी साठी लागणारा वेळ कमी होईल.
Comments are closed