पिंपळे गुरव :- पिंपळे गुरव येथील पूजा हाॅस्पिटल समोर राहत असलेल्या नितीन नवले यांनी आयटी कंपनीत असलेल्या प्रवीण पवार या युवकाचे नोटांनी भरलेले व महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट त्या युवकास सुपूर्द करून प्रामाणिकपणाचा आदर्श समाजा समोर ठेवला आहे. नितीन नवले हे एक स्कूलवॅन चालक असुन लाॅकडाऊन पासून बेरोजगार आहेत. घरी पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
शुक्रवार दि.३ रोजी रात्री साडे नऊच्या दरम्यान एक युवक फोन वर बोलत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या पाईपवर आपले पैशांनी भरलेले पाकीट विसरून गेला. त्यावेळी नवले त्यांच्या घरासमोर मित्राशी गप्पा मारत उभे होते तेवढ्यात त्यांचे लक्ष त्या पाकीटसदृश्य वस्तूकडे गेले. त्यांनी ते उचलून पाहिले असता त्यात चार हजार रुपये रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे होती . त्यांनी पाकिटात काही संपर्क क्रमांक मिळतो का ते शोधले असता एका डाॅक्टरांच्या चिठ्ठीवर मोबाईल नंबर दिसला त्यावर संपर्क साधला असता तो नंबर पाकिट हरवलेल्या व्यकिचाच असल्याचे आढळून आले. त्यांनी ते पाकीट जसेच्या तसे प्रवीण पवार या मुळ मालकास सोपवून स्कुलवाल्या काकांचा समाजात असलेला प्रामाणिकपणा या उदाहरणसहित दाखवून इतरांना आदर्श घालून दिला आहे.
प्रतिक्रिया देताना नितीन नवले म्हणाले की दोन दिवसांपूर्वी घोराडेश्वर येथे माझ्या गाडीची चावी हरवली होती ती एका पेरूविक्रेता युवकास दिसली व त्याने चावीवरील मोबाईल नंबर वर संपर्क साधून मला चावी परत केली. योगायोगाने आज त्याची परतफेड करण्याची संधी ईश्वराने मला दिली व मी ती पूर्ण केली. ज्याची त्याची वस्तू मुळ मालकास मिळाली तर त्यांना मिळणारा आनंद निराळा असतो.
लाॅकडाऊन मुळे शाळा बंद आहेत मार्च पासून असलेला हा बंद स्कूलवॅन चालकांच्या आयुष्यात परीक्षा बनून आला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लाॅकडाऊन पासून काम नाही कित्येक पालक गावाला गेलेत तर जे अजूनही शहरात आहेत ते लाॅकडाऊनचे कारण देत पैसे मागताच हात वर करत आहेत. रोज वर्तमानपत्रात चोरी, दरोड्याच्या बातम्या येत आहेत. लोकांच्या हाताला काम नसल्याने नितीमत्ता ढासळत असल्याचे चित्र आहे. अशा विपरीत परिस्थितीत व आर्थिक विवंचनेत असतानाही नितीन नवले यांनी आपल्या स्कूलवॅन वाले काका हा प्रामाणिक पणाचा शब्द असल्याचे आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.
परिसरातील नागरिकांकडून त्यांच्या प्रामाणिकपणा बद्दल कौतुक केले जात आहे. मात्र कौतुका सोबतच गरज आहे ती नितीन नवले यांच्या सारख्या स्कूलवॅन चालकांच्या कुटुंबाला आधार देण्याची.
punetoday9news तर्फे आपणास आवाहन करण्यात येते की आपण आपल्या परीने आपल्या परिसरातील अशा स्कूलवॅन चालकांना आर्थिक अथवा वस्तू रुपात मदत करून सहकार्याचे आपले कर्तव्य पूर्ण करावे.
Comments are closed