पिंपरी,दि.७( punetoday9news):-
कला, साहित्य, चित्रपट आदी सांस्कृतिक घटकांना एका धाग्यात गुंफण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून, या फाउंडेशनचे उद्घाटन प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनच्या लोगोचे अनावरणही मंगेशकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, गायिका राधा मंगेशकर यांच्या सांगितिक मैफिलीला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
           उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संत साहित्य व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील, महापौर माई ढोरे, नाट्यपरिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नृत्यविशारद नंदकिशोर कपोते, पुरुषोत्तम पाटील, वनाधिक्षक रंगनाथ नाईकवडे, पांडुरंग दातार, डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. अमरसिंह निकम, उद्योजक शंकर जगताप, फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयराव भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, उन्नती फौंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, उद्योजक संजय भिसे, उद्योजक राजू भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
           फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयराव भिसे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना विजयराव भिसे यांनी सांगितले, की फाउंडेशनच्या नावात पिंपरी चिंचवड शहराचा उल्लेख असल्याने आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे. साहित्य, संगीत, नृत्य, नाट्य, अध्यात्म अशा घटकांना सोबत घेऊन पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ राबविणे, हे पिंपरी चिंचवड कल्चरलचे मुख्य उद्दिष्ट आहे. फाउंडेशनच्या ध्येय धोरणांची माहितीही भिसे यांनी यावेळी दिली.
          डॉ. रामचंद्र देखणे यावेळी बोलताना म्हणाले, की दिवाळी पाडवा व जागतिक रंगभूमिदिन यानिमित्त पिंपरी चिंचवड कल्चरल फाऊंडेशनचे उद्घाटन झाले, हा योगायोग आहे. जे स्थान पुण्यातील त्रिदल फाऊंडेशनला आणि नाशिकच्या कुसुमाग्रज फाऊंडेशनला आहे; ते स्थान पिंपरी चिंचवड कल्चरल फौंडेशनने प्राप्त करावे. पिंपरी चिंचवड शहराची स्वत;ची अशी वेगळी संस्कृती आहे. महाराष्ट्रातील विभिन्न भागातले

लोक चरितार्थासाठी आपली आपली संस्कृती घेऊन इथे आले आहेत. या सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे काम या फाऊंडेशनला करायचे आहे. कीर्तन, तमाशा व कुस्ती या तिन्ही फडांना इथे चांगली दाद मिळत आली आहे. तसेच संतांच्या पालख्या या नगरीतून मार्गस्थ होतात. संतांच्या विचारांची वेगळी संस्कृती, अध्यात्माची वेगळी संस्कृती इथे आहे. तसेच लोकरंगभूमि, संगीतशास्त्र, नृत्य, नाट्य असा उत्कर्ष या शहरात झाला आहे. त्यामुळे राजकीय द्वैतासोबत सांस्कृतिक अद्वैताला सोबत घेऊन जाण्याचे मोठे आव्हान फाऊंडेशनसमोर असणार आहे, असेही डॉ. देखणे यांनी सांगितले.
           राधा मंगेशकर यांनी फाऊंडेशनला शुभेच्छा देत सर्व घटकांना सोबत घेऊन वाटचाल करावी, असे आवाहन केले.
           भाऊसाहेब भोईर म्हणाले, की खूप मोठी जबाबदारी फाऊंडेशनवर आहे. सर्वांना सोबत घेऊन मोठे आव्हान आहे. फाऊंडेशनच्या कार्यात राजकीय ढवळाढवळ व्हायला नको.
          खासदार बारणे यांनी सांगितले, की या फाऊंडेशनच्या निमित्ताने शहराच्या सांस्कृतिक वैभवात निश्‍चित भर पडली आहे. शहराचे सांस्कृतिकीकरण करण्यात अनेक घटकांचा समावेश आहे. हे फाऊंडेशन शहरातील विविध कला घटक जोपासण्याचे काम निश्‍चित करेल, असा विश्‍वास आहे.
          कार्यक्रमात फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयराव भिसे, सचिव विजय बोत्रे, गौरी निलजकर, सतीश इंगळे, अनिल म्हाळसकर, सुनील थोरात, शशिकांत काटे, दिनेश काटे, शहाजी बारणे, शिल्पाताई बिडकर, जीवन भोपे, योगेश जाधव, हेमंत खंडागळे, अजिंक्य भिसे, निलांबरी भिसे, सुरंजन खंडाळकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बोधचिन्हाची निर्मिती केलेल्या स्नेहल पोफळे व सुखदा योगी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
        सूत्रसंचालन फाऊंडेशनचे सचिव विजय बोत्रे यांनी, तर आभार गझलकार संतोष घुले यांनी मानले.
पिंपरी चिंचवड शहर वासियांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. पिंपरी चिंचवड फाऊंडेशनच्या नावातच ‘पिंपरी चिंचवड’ शब्द असल्याने शहराचा नावलौकिक जपण्याची मोठी जबाबदारी आहे. भविष्यात ही संस्था आपली वेगळी ओळख निर्माण करेल. देशातलं राहण्यायोग्य शहर घडवत असताना सांस्कृतिक शहर म्हणून हे शहर नावारुपाला येणे गरजेचे आहे. राजकीय बरोबरच सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक घटकांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. आणि या सर्व घटकांना सोबत घेऊन हे फाऊंडेशन मार्गक्रमण करेल
 – राजेश पाटील, महापालिका आयुक्त

Comments are closed

error: Content is protected !!