पिंपरी,दि. १० ( punetoday9news):- मेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरील वाहतूक बोपोडी-खडकी बाजारमार्गे वळविण्यात आली आहे. मात्र, बोपोडी ते खडकी बाजार दरम्यान एकही सिग्नल नसल्याने वाहने भरधाव असतात. परिणामी नागरिकांना रस्ता ओलांडणे कठीण होऊन बसले आहे.
त्यामुळे या रस्त्यावर नागरिकांसाठी किमान 30 सेकंदाची सिग्नल यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी वाहतूक पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
बोपोडी ते खडकी स्टेशन दरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक बोपोडीतून खडकी बाजार मार्गे वळविण्यात आली आहे. या मार्गावर किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनी, तसेच झोपडपट्टीही आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यातच शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची आणि पालकांची वर्दळ वाढली आहे. पेन्शनर ज्येष्ठ नागरिक, महिला, कंपनीतील कामगार आदी सर्वांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे होऊन बसले आहे. स्थानिक नागरिकांच्या मते इथे गेल्या तीन महिन्यात रस्ता ओलांडणाऱ्या लोकांना वाहनांची धडक बसून कायमचे जखमी व्हावे लागले आहे.
याबाबत रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की दररोज सकाळी व सायंकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांची गर्दी, शाळेतील विद्यार्थ्यांची गर्दी असलेल्या या रस्त्यावर भरधाव वाहनांमुळे रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावर बोपोडी ते खडकी बाजार दरम्यान प्रत्येक तीन मिनिटाला 30 सेकंदाचा सिग्नल असेल तर नागरिकांना रस्ता ओलांडणे सोयीस्कर होईल. पर्यायाने वाहनांची धडक बसून नागरिक जखमी होणार नाहीत.
Comments are closed