नवी दिल्ली , 14 : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन खेळाडूंचा समावेश आहे. तर गिर्यारोहक प्रियांका मोहिते यांना तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये वर्ष 2021 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करून खेळाडूंना गौरविण्यात आले.
दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी 12 खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 35 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाले होते. यासह ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’ आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ असे एकूण 10 खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना जाहीर करण्यात आले होते. याशिवाय ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील 5 खेळाडूंना जाहीर झाले होते. 2 संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ आणि पंजाब विद्यापीठ, चंदीगडला ‘मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी’ ची घोषणा करण्यात आली होती.
बुद्धिबळ खेळाडू ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार प्रदान
बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. श्री कुंटे यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतला आहे. भारतीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप (ICC) मध्ये आतापर्यंत दोन सुवर्ण,4 कांस्य पदक पटकाविली आहेत. 2003 ची ब्रिटिश चेस चॅम्पियनशिप त्यांनी जिंकली आहे. राष्ट्रकुल बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये दोन पदके मिळविली होती. वर्ष 2000 मध्ये श्री कुंटे यांना ‘ग्रँडमास्टर’ चा खिताबही बहाल झाला आहे. त्यांच्या बुद्धिबळातील एकूण यशस्वी वाटचालीसाठी त्यांना ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार आज सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी हिमानी उत्तम परब यांना आणि अंकिता रैना यांना टेनिसमधील आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता. मल्लखांब खेळाडू हिमानी उत्तम परब हिने लहान वयापासूनच मल्लखांब या साहसी खेळ खेळायला सुरवात केली. मल्लखांबवर विविध कसरती करण्यात हिमानी अतिशय कुशल आहे. तिने विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे. प्रथम आंतरराष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत कुमारी हिमानीने सुवर्ण पदक पटकाविले आहे. तीच्या या कर्तबगारीसाठी अर्जुन पुरस्काने आज गौरविण्यात आले.
टेनिस खेळाडू अंकिता रैना जागतिक टेनिस स्पर्धेत उच्च मानाकंन गाठला आहे. अंकिता लहान वयापासून टेनिस खेळायला सुरूवात केली. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सहभाग घेऊन पदके आपल्या नावावर केले आहेत. अंकिताचा जन्म गुजरातचा असून वर्ष 2007 पासून रैना हिने पुणे येथे व्यावसायिक टेनिसचे प्रशिक्षण घेतले आहे.
गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्कार
गिर्यारोहण या साहसी क्रीडा प्रकारात नवनवीन विक्रम करणाऱ्या गिर्यारोहक प्रियांका मंगेश मोहिते यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने आज गौरविण्यात आले. अन्नपूर्णा शिखरवर चढणारी प्रथम भारतीय महिला कुमारी मोहिते या आहेत. यासह अन्य शिखरावर ही त्यांनी चढाई केलेली आहे.
Comments are closed