क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती आदिवासी समन्वय समितीतर्फे उत्साहात साजरी.

पिंपरी, दि.१५( punetoday9news):-
बिरसा मुंडाच्या उलगुलानाची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. आदिवासी समाज विस्थापण, बेरोजगारी, धर्मांतरण, बोगसांची घुसखोरी याने समाज वेढला आहे. आज मितीला उलगुलान करण्याची, चहू दिशांनी आदिवासी अस्तित्व व अस्मितेसाठी सर्व शक्तीनिशी प्रतिकार करीत लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन आदिवासी समन्वय समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विष्णू शेळके यांनी केले.
क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा जयंती उत्सव आदिवासी समन्वय समितीच्या पिंपळे गुरव येथील मुख्यालयात उत्साहात पार पडला. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. शेळके बोलत होते. यावेळी पिंपरी चिंचवड नागरवस्ती विकास योजनेच्या दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, निवृत्त बँक अधिकारी दिलीप लोखंडे, परधान समाज मित्र मंडळाचे रघुनाथराव आत्राम, आदिवासी महासंघाच्या रोहिणी शेळके, सह्याद्री आदिवासी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सखाराम वालकोळी, निवेदिका दुर्गा पारधी, आदिम वधू-वरच्या संचालिका मीनल भांगले, युवा कार्यकर्ते अक्षय बुरुड, गिरीश गवारी, रोहित वाजे, श्रेया वरे, जितेश सस्ते, गौरव जफरे आदी उपस्थित होते
प्रा. शेळके म्हणाले, की बिरसांचे चरित्र मन मेंदूत साठवून त्यांच्या समग्र चरित्रातील पैलू अभ्यासून त्यांच्या संघर्षातून शोध आणि बोधही घेण्याचा प्रयत्न आदिवासी युवकांनी केला पाहिजे. बिरसांचा लढा दिक्कू विरोधात होता. “आबूआ देश मा आबूआ राज”ची हाक देणाऱ्या बिरसांनी अल्प जीवनकाळात सरजामदारी, सावकारी, वतनदार आणि इंग्रजाविरुद्ध आदिवासीयत टिकविण्यासाठी आदिवासींच्या जमिनी वाचविण्यासाठी, आदिवासींच्या रुधिगत परंपरा, रीतीरिवाजामध्ये दखलअंदाजी विरुद्ध दिलेला लढा जगभरातील प्रत्येक आदिवासींसाठी प्रेरणादायी आहे. बिरसांनी उपदेश केलेला बिरसाईत हा धर्म, ती जीवनशैली प्रत्येक आदिवासींनी अंगिकारली पाहिजे.
प्रा. शेळके पुढे म्हणाले, की आदिवासींच्या जमिनी बळकावण्यासाठी टपलेल्या भांडवलशाही, राजसत्तेला संविधानातील पाचव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीने सडेताडे व निर्णायक उत्तर देण्याची वेळ आली आहे. आदिवासी अस्मिता व अस्तित्वाच्या निर्णायक लढ्यासाठी संविधानिक मार्गाने लढा उभारून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वानुसार निर्णायक व राज्यकर्ती जमात होण्यास, आदिवासीचे स्वंतत्र, राजकीय अस्तित्व निर्मिण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पुढील दशकात आदिवासी सत्तेत भक्कमपणे पाय रोवून उभा राहिलेला दिसेल, असेही त्यांनी सांगितले.

 

Comments are closed

error: Content is protected !!